बाधित शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या-आ.सतीश चव्हाण

आ.सतीश चव्हाण यांनी केली वैजापूर, गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पीक पाहणी

Displaying IMG-20211001-WA0120.jpg

वैजापूर ,१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गुलाब चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीकाठच्या गावातील जनावरे, दुकाने वाहून गेली आहेत. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांसह नुकसान झालेल्या दुकानदारांना त्वरीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा सूचना आ.सतीश चव्हाण यांनी वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांना केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.सतीश चव्हाण यांनी  शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील बोरसर व परिसरातील गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आ.सतीश चव्हाण मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा पाहणी दौरा करून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. आज (दि.1) त्यांनी वैजापूर तालुक्यातील बोरसर, कोरडगाव, खंडाळा तर गंगापूर तालुक्यातील बाबरगांव, येसगांव, तुर्काबाद खराडी आदी ठिकाणी भेटी देऊन शेतकरी, ग‘ामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. बोरसर येथे नदीकाठच्या शेतकर्‍यांची बरीच जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे जनावरांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांचा पंचनामा होणे आवश्यक असल्याचे सांगितले जात असल्याने पंचनाम्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी यावेळी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केल्या. तसेच याठिकाणी घरांची देखील मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून हातावर पोट असणार्‍या ग्रामस्थांची छोटी-मोठी दुकांनामध्ये पाणी शिरल्याने दुकांनातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. कोरडगाव येथील पाझर तलाव फुटल्याने शेत जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. प्रशासकीय पातळीवर त्वरीत पाठपूरावा करून पाझर तलावाचे काम करून दिल्या जाईल असे आश्वासन आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी कोरडगाव ग्रामस्थांना दिले.

खंडाळा येथील नुकसानग‘स्त भागाची पाहणी करून आ.सतीश चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे आदींसह आढावा बैठक घेतली. वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांसह ज्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे अशा नागरिकांना तसेच दुकानदारांना शासनाच्या निकषाप्रमाणे त्वरीत आर्थिक मदत द्यावी, ज्या शेतकर्‍यांच्या विहीरी ढासळल्या आहेत त्यांना विशेष बाब म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहीरी द्याव्यात, बाधित एकही व्यक्ती नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच सध्या शासनाकडून नुकसानग‘स्त भागासाठी मिळत असलेल्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करावी अशी मागणी लवकर शासनस्तरावर करणार असल्याचे यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.

याप्रसंगी माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.कैलास पाटील, तालुकाध्यक्ष प्रताप निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पवार, संतोष माने, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नीळ, युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, जगदीश पवार, साईनाथ मतसागर, सरपंच सुदाम अबीलके, राजेंद्र मगर, बाळासाहेब भोसले, विशाल शेळके, गणेश पवार, दीपक राजपूत, रवी पाटणे, आदींची उपस्थिती होती.

आपदग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधला व शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जाईल.असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.यावेळी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, विशाल पवार, जगदीश पवार,साईनाथ मतसागर, सरपंच सुदामराव  आंबिलके, माजी सरपंच बाळासाहेब पवार,अरुण होले, मारुती कानडे, विलास पवार आदी उपस्थित होते.