फुलंब्री तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरु,36 हजार 733 शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान

फुलंब्री 30 सप्टेंबर / प्रतिनिधी :- तालुक्यात सोमवार व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्यासाठी महसुल राज्यमंञी व जिल्हाधिकारी यांनी बुधवार  तहसिल कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची  आढावा बैठक घेऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना केल्या होत्या त्या सुचनांची अंमलबजावणी तहसिल कार्यालयाने सुरु केली असुन तालुक्यात प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्यात 28 हजार 620 हेक्टर क्षेञातील सुमारे 36 हजार 733 शेतकऱ्यांचे  सोमवार व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने जमिनी खंगल्या आहेत. अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे वाहुन गेले. मंगळवारी भर पावसात जिल्हा परीषदेच्या बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी वडोदबाजार परीसरात दौरा केला तिथे नागरिकांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते धान्याची नासाडी झाली होती अशा नागरिकांना महिनाभर पुरेल एवढा किराणा त्यांनी वाटप केला. 

मंगळवारी सायंकाळी महसूल राज्यमंञी अब्दुल सत्तार  यांनी तात्काळ आढावा बैठक बोलावली या बैठकीस जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, बांधकाम सभापती किशोर बलांडे, तहसिलदार डॉ.शितल राजपुत, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तालुका कृषी अधिकारी, सर्व ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती. यावेळी महसुल  राज्यमंत्री सत्तार यांनी तात्काळ पाहणी करा, जागेवर  जाऊन पंचनामे करा अशा सुचना केल्या त्यानंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी गिरजा नदी काठच्या गावाचा दौरा केला. बुधवार सकाळ पासुनच तालुक्यात सगळीकडे पंचनामे सुरु झाले.  याकामी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक पंचनामे करीत असल्याची माहीती तहसिलदार डॉ.शितल राजपुत यांनी दिली