एक रकमी एफ.आर.पी.मिळण्यासाठी भारतीय किसान संघाचे तीव्र आदोलन

पुणे ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-
भारतीय किसान संघामार्फत पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
एफ् आर् पी तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्याचे कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला सुचवले आहे. राज्य सरकारनेही अशाच स्वरुपाची शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे. सरकार व साखर कारखाने यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना मालाचे पैसे वेळेत मिळू न देण्याचे षड्यंत्र करण्यात आल्याचा आरोप या प्रसंगी करण्यात आला.


ऊस कारखान्याला दिल्यापासून १५ दिवसांच्या आत शेतकऱ्याचे पैसे न दिल्यास १५% व्याजाने देणे कायद्याने बंधनकारक असताना सरकार असला विचार का करत आहे , असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. आजतागायत अनेक कारखान्यांनी पैसे वेळेत न देण्याचे प्रसंग घडले आहेत . पण एकाही कारखान्यावर कारवाई न होणे हा सरकार व प्रशासनाचा व्यवहार संशयास्पद आहे.ऊसाला चार हजार रु प्रतिटन भाव मिळावा ही मागणी या प्रसंगी करण्यात आली.
शेतकऱ्यांना आर्थिक दुष्टचक्रात अडकवणारा एफ् आर् पी तुकड्यात देणारा असला निर्णय घेतला जाऊ नये यासाठी भारतीय किसान संघाच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनी आजचे धरणे आंदोलन केले.सदर आंदोलन ॲड माऊली तुपे , ॲड सुभाष देशमुख ,ॲड रावसाहेब शहाणे , मदनराव देशपांडे , चंदनराव पाटील , कपीलाताई मुठे यांच्या नेतृत्वाखाली झाले .या प्रसंगी किसान संघाचे राष्ट्रीय नेते मान साया रेड्डी यांनी साखर कारखान्यांचे अर्थशास्त्र उलगडून सांगितले. साखरेसहित ३० उत्पादने ऊसापासून तयार केली जातात. त्यामुळे कारखाना तोट्यात जाऊ शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांना योग्य रक्कम दिल्यास साखर महाग होईल या भ्रमातून व गैरसमजातून सर्वांनी बाहेर पडावे.
आजपर्यंत ज्या लोकांनी शेतकऱ्यांची आंदोलने केली त्यांनी राजकारणाचा मार्ग पत्करुन लाभाची पदे पटकावली .त्यामुळे शेतकरी उघड्यावर पडले. भा. कि. संघ अराजकीय संघटना असल्यामुळे हा प्रश्न कोणत्याही तडजोडीशिवाय सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे चंदनराव पाटील म्हणाले .