खेळांमुळे सकारात्मक वैचारिक शक्ती वाढते- कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

नांदेड ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :- प्रत्येक व्यक्तीच्या विचारधारेमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन पैलू असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये शंभर टक्के सकारात्मकता किंवा नकारात्मकता नसते. विचारशैलीमध्ये जेवढी जास्त सकारात्मकता तेवढी जास्त प्रगती होते. याउलट जेवढी जास्त नकारात्मकता तेवढी अधोगती जास्त होते. त्यामुळे प्रगत जीवन जगण्यासाठी व्यक्तीच्या विचारशैलीमध्ये सकारात्मकता खूप महत्त्वाची बाब आहे. आणि हे शक्य आहे ती खेळांमुळे. खेळाडू वृत्तीमुळे. खेळांमुळे सकारात्मक विचार शक्तीमध्ये वाढ होते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.

Displaying IMG-20210930-WA0076.jpg

ते दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित भारत स्वातंत्र्य दिनाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत ‘फिटनेस इंडिया फ्रीडम रन २.०’ व ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.

Displaying IMG-20210930-WA0077.jpg

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत नांदेड गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह  परिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, प्रा. डॉ. सिंकूकुमार सिंह, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, प्रा. डॉ. बळीराम लाड यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पो. नि. चिखलीकर आपल्या मनोगतपर म्हणाले, कोरोनामुळे आपल्या शरीराची बरीच हानी झाली आहे. या महामारीमध्ये ज्यांना कोरोना झाला त्यांच्या शरीराचे नुकसान झालेच आहे पण ज्यांना कोरोना झाला नाही त्यांनाही खेळापासून दूर झाल्यामुळे, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यापीठातील आकर्षक असे खेळाचे मैदान आणि येथील शुद्ध ऑक्सिजन हेच खरे शारीरिक स्वास्थ आहे. त्यामुळे खेळाडूंनी याचा पुरेपूर उपयोग घेऊन स्वतःच्या खेळामधील कौशल्य वाढवावे आणि तंदुरुस्त रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम प. पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’ या कार्यक्रमांतर्गत उपस्थित खेळाडूंना दोन किलोमीटर पळण्यासाठी मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला व सर्व मान्यवरानीही या दौडमध्ये सहभाग घेतला. वेट लिफ्टिंगच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ही यावेळी मान्यवरांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले. त्यानंतर शेवटी सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. गजानन कदम, संजयसिंह ठाकुर, सुभाष थेटे, मुजीब हसन, शिवाजी हंबर्डे, भरत चव्हाण, रतनसिंग पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.