अतिवृष्टी व पूरग्रस्त नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन योग्य मदत केली जाईल- उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यातून आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्ह्यातील उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली. शेतकरी आणि नुकसानग्रस्थांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेऊन शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त नुकसानीची सरसकट पंचनामे करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवन गोरे,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,तहसीलदार गणेश माळी, इत्यादी उपस्थित होते.

May be an image of 12 people, people standing, grass and tree

पालकमंत्री श्री.गडाख यांनी आज उस्मानाबाद तालुक्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त दाऊतपूर, इर्ला, रामवाडी आणि तेर तर कळंब तालुक्यातील वाकडी (इस्थळ) आणि सौंदणा (आंबा) या गावांना भेटी देऊन पाहणी केली. श्री.गडाख यांनी दाऊतपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानीबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.तसेच पशुधनाबाबत पंचनामे करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घ्यावी,अशी सूचनाही श्री.गडाख यांनी यावेळी केली.तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या लवकरात लवकर पंचनामे करावेत, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.

May be an image of 11 people, people standing and outdoors

तालुक्यातील 42 सर्कल पैकी 35 सर्कल अतिवृष्टी झाली आहे. तसेच काही ठिकाणी काही सर्कलमध्ये 140 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विमा कंपन्यांना 72 तासांच्या आत पंचनामा किंवा तक्रार करण्याची अट शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी चिंता करु नये. त्यांना विम्याची रक्कम मिळेल, असे आश्वासनही श्री.गडाख यांनी यावेळी दिले.

May be an image of one or more people, people sitting, people standing and outdoors

कालपर्यंत जीवित हानी होऊ नये यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील होते आज पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. या अतिवृष्टीत फक्त पिकांचे नुकसान झाले नव्हे तर पशुधन आणि नदीकाठातील गावकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे एकूण किती नुकसान झाला आहे हे अद्याप निश्चित झालेले नसून पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानाची आकडेवारी समोर येईल. घरांची पडझड झालेल्या पूरग्रस्तांना आठ दिवसांच्या आत मदत करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पिकांच्या बाबतीत साधारणपणे संपूर्ण मराठवाड्यात अशीच अवस्था आहे पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे काही दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

May be an image of standing and outdoors

पालकमंत्री श्री.गडाख यांनी इर्ला येथे ग्रामस्थांशी चर्चा केली आणि येथील बाधित बंधाऱ्यावरचे आणि रस्त्याची पाहणी केली. गावाला शंभर केव्हीचे दोन डीपी आणि पाण्यासाठी टँकर चालू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.येथील रस्त्याचे आणि बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना निर्देश दिले. यानंतर त्यांनी इर्ला गावातील घरांचे आणि वस्त्यांची पाहणी केली. नुकसान झालेल्या घरांना लवकर मदत करुन यावेळी गावातील आगसखांड नाल्याचे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कळंब तालुक्यातील वाकडी (इस्थळ) आणि सौंदणा (आंबा) येथेही भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

May be an image of 6 people, people standing and outdoors

रामवाडी येथील पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतांची आणि बंधाऱ्यांची पाहणी केली. याबाबत जलसंधारण विभागाला पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली, त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांना दिलासा दिला आणि लवकरात लवकर आपल्याला नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. सोयाबीन आणि ऊस ही पिके 100 टक्के नष्ट झाल्याने, शेतकऱ्यांना मावेजा किंवा मोबदला मंत्रिमंडळात चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना नुकसानीबाबत तक्रार केली नाही किंवा याबाबत त्यांचे पंचनामे झाले नाहीत,त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून विशेष पत्र विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे. सरसकट पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग, तलाठी आणि ग्रामसेवक हे पूर्ण गतीने कामं करतील.त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शासन त्यांच्या पाठीशी आहे,असा दिलासाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.