नारंगी धरणाचे पाच दरवाजे उघडले, 6400 क्यूसेस पाणी विसर्ग-नदीकाठच्या गावात पूरस्थिती

वैजापूर ,२९ सप्टेंबर /जफर खान  :-गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने वैजापूर शहरालगतचे नारंगी धरण 100 टक्के भरले आहे. काल रात्री धरणाचे पांच दरवाजे उघडण्यात येऊन त्याद्वारे 6 हजार 400 क्यूसेस पाणी नारंगी नदीपात्रात सोडण्यात आले असून,नदीकाठच्या भग्गगाव, डवाळा,खंबाळा, गोयगाव,भऊर,किरतपुर,हिंगोणी,पुरणगाव,नारायणपूर या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील दत्तनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्याभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी,शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके,उपतालुकप्रमुख कल्याण जगताप,संजय बोरणारे आदींनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन शेतवस्ती व घरांमध्ये पाणी शिरलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

नारंगी धरणातून काल सायंकाळी 4 वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 180 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर रात्री अकरा वाजेनंतर 6 हजार 400 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता रात्री अकरा वाजेनंतर अचानक पाणी विसर्ग वाढवून 6 हजार 400 क्यूसेस केले त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठच्या पुरणगाव, नारायणपूर,किरतपुर,भऊर व अन्य गावात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे शेत जमिनी वाहून गेल्या असून,शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.नारंगी धरणातून पाण्याचा विसर्ग रात्री अचानकपणे वाढल्यामुळे शहरातील नदीकाठच्या दत्तनगर व छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले.नगराध्यक्षा शिल्पाताई राजपूत, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, नगरसेवक सचीन वाणी, शैलेश चव्हाण, गणेश खैरे  आदींनी या भागात जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. धरणातून पाणी सोडतांना कोणतेही नियोजन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न  केल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून,शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.