मराठवाड्यात पावसाचा हाहाकार,20 लाख हेक्टरचे नुकसान

अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी

औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत. 20 लाख हेक्टरवर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात आतापर्यंत 20 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दिली आहे. ज्यांचे नुकसाना झाले आहे, त्या सर्वांना मदतीच्या सूचना  वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे.

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक भागात शेती पाण्याखाली गेलीय. तर सोयाबीनसह ऊस पिकांचं भरुन न येणारं नुकसान झालंय. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचं वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.

‘महाराष्ट्राला 7 हजार कोटी रुपये द्या’

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान 7 हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीय. तलाव फुटल्याने बोरसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. याचं प्रवाहात एक मनोरुग्ण महिला वाहून गेली.