खोखो चळवळीची वाटचाल योग्य दिशेनं असल्याचं सलग सातव्या विजेतेपदांमुळे पुन्हा एकदा सिद्ध

राष्ट्रीय अजिंक्यपदक विजेत्या कुमार-कुमारी खोखो संघांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर अभिनंदन

मुंबई, २८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भुवनेश्वर येथे झालेल्या ४० व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय खोखो स्पर्धेत सलग सातव्यांदा अजिंक्यपद मिळवलेल्या महाराष्ट्राच्या कुमार आणि कुमारी या दोन्ही संघांचं, तसंच कुमारी गटात उपविजेत्या ठरलेल्या कोल्हापूर संघाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राच्या खोखो संघांनी मिळवलेल्या यशानं राज्यातील खोखो चळवळीची वाटचाल योग्य दिशेनं सुरु असल्याचे सिद्ध झालं आहे. या यशानं प्रेरीत होऊन अधिकाधिक युवक खोखो खेळाकडे वळतील. महाराष्ट्राच्या क्रीडा चळवळीला पुढे नेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, महाराष्ट्राच्या कुमार संघाने आतापर्यंत 32 वेळा तर, कुमारी संघांनी २३ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे. 40 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. अहमदनगरच्या आदित्य कुदळे यानं ‘वीर अभिमन्यू’ पुरस्कार, उस्मानाबादच्या अश्विनी  शिंदे हिनं उत्कृष्ट खेळ करीत ‘जानकी’ पुरस्कार पटकावला. महाराष्ट्राची वृषाली भोये स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक तर, कोल्हापूरची वैष्णवी पोवार उत्कृष्ट संरक्षक ठरली. त्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.