राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार,रजनी पाटील बिनविरोध

मुंबई ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.

          काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

          राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन केले.