कलावंतांनी लाचार होऊ नये हीच अपेक्षा : श्रीकांत देशमुख

औरंगाबाद,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कलावंत हा कलावंत असतो. त्यामुळे कलावंतांनी राजकीय नेत्यांच्या पुढे लाचार झाले नाही पाहिजे. राज्याला अनेक मुख्यमंत्री मिळाले. अनेक मिळतील. पण नेमाडे, तुकाराम हे एकच आहे. दुसरे होऊ शकत नाहीत. यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते, पण ते साहित्यिक होते. त्यामुळे लेखक म्हणून यशवंतराव आज आपल्या आहेत, असे ठाम प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले.
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी संत जनाबाई व्यासपीठावर सकाळच्या सत्रात श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत कवी पृथ्वीराज तौर आणि संदीप जगदाळे यांनी घेतली.

May be an image of 3 people, people sitting, people standing and indoor

आजचे कवी स्वत:शिवाय दुसऱ्याचे काही वाचतच नाहीत. त्यांनी फुले, शाहु, आंबेडकर, आगरकर, टिळक हे माहिती नसतात. सुधारणा करण्यासाठी दुसऱ्याचे वाचले पाहिजे. कवी असेल किंवा इतर कोणीही हा कलावंत असतो. ज्या कलावंताला विचारधारा नसते. तो कलावंत प्रमाणिक असू शकत नाही, असे प्रमाणिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या मुळाचा शोध घेतला पाहिजे. शाेध घेत ते टिकवूनही ठेवले पाहिजे. ९० च्या कालावधीनंतर जग बदलले आहे. त्यात आपणही बदललो. त्यामुळे कवितेचे टप्पे पाडणे चुकीचे आहे. मात्र याच कालखंडाने निर्णय स्वातंत्र्याचा बळी घेतला आहे. आज शेतीपासून जोपर्यंत दूर जात नाही. तोपर्यंत प्रगती होणे शक्य नाही, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेला देशीवाद भारतीय संस्कृतिमध्ये मुळापर्यंत रूजलेला आहे. त्यातील आई, बाप ही भारतीय कल्पना आहे. त्याला दूर करु शकत नाहीत. मात्र या देशीवादाला काहीजण जातीवाद समजतात. पण हा जातीवाद नाही,असेही त्यांनी सांगितले. 

May be an image of 3 people, people sitting, people standing and indoor

तसेच जो कलावंत भिती बाळगतो तो कलावंत असू शकत नाही. कलावंताला दररोज कोणी कशाचीही भिती घालू शकतो. त्यामुळे कलावंतांनी निर्भिड असले पाहिजे, असेही देशमुख यांनी शेवटी सांगितले. स्वत:च्या दोन कवितांनी देशमुख यांनी मुलाखतीचा शेवट केला.