खुलताबाद नगरपरीषदेचा गैरकारभार चव्हाट्यावर – पाच लाखांचे बोगस बिल काढल्याचा आरोप, नगरविकास राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

खुलताबाद ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- खुलताबाद नगरपरिषदेच्या गैरकारभाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत.

७ ऑगस्ट रोजी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा अयाज बेग यांनी खुलताबाद नगरपरिषदेत मनमानी कारभार सुरू असून या गैरकारभारविरुद्ध तक्रार केली होती. खुलताबाद  नगरपरिषदेच्या गैरकारभारविरुद्ध नगरसेवक मिर्झा अयाज बेग यांनी केलेल्या तक्रारीत  अनियमितता झाल्याचा अतिशय गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नगरसेवक मिर्झा अयाज बेग यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,  वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून खुलताबाद नगरपरिषद अंतर्गत  फलायदारान शाळेजवळ झालेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या खोदकामात काळी माती लागल्याचे दाखवून अंदाजपत्रकापेक्षा जास्तीची रक्कम ( पाच लाख १७ हजार ४४१ ) परस्पर काढून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. खुलताबाद नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलायदारान शाळेजवळ केलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाचे  पूर्ण केले. या कामाची अंदाजपत्रकात किंमत ५४ लाख ४६ हजार ४७२ इतकी होती. सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरू असतांना नगरपरिषदेला खोदकामात काळी माती लागल्याचा नगरपरिषदेला अचानक साक्षात्कार झाला.  खोदकामात काळी माती लागल्याचे भासवून तत्कालीन मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, अभियंता पंकज पवार, नगराध्यक्ष एस एम कमर, उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती सुरेश मरकड यांनी संगनमताने सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता तुलीप कन्ट्रक्शन कंपनीला पाच लाख १७ हजार ४४१ रुपयांचे मोजमाप पुस्तिकेत नोंद घेत बोगस बिल काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

सुरुवातीला या कामाचे आरए बिल २८ लाख ४४ हजार ६७१ रुपये देण्यात आले. खोदकाम करतांना काळी माती लागली होती तर सुधारित प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव का पाठवण्यात आला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. १५ मार्च २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ३३८ मध्ये विषय क्रमांक ४  बेग यांनी या कंत्राटदाराला देयके देण्याबाबत विरोध दर्शविला होता. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या आदेशानुसार २४ सप्टेंबर रोजी नगरविकास उपसचिव विद्या हम्पय्या  यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

ठराव संशयास्पद नगरसेवक शेख अब्दुल हाफिज अब्दुल रशीद

सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामात काळी माती लागली म्हणून तुलीप कन्ट्रक्शन कंपनीला पाच लाख १७ हजार ४४१ रुपये देण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२० रोजीच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत दाखवण्यात आलेला ठरावही बोगस आहे. या ठरावाचे सूचक म्हणून माझे नाव आहे. त्या सभेला मी उपस्थितच नव्हतो,  आपण सभेत गैरहजर असतांना आपल्या नावाने बोगस ठराव घेण्यात आला आहे. 

उच्च न्यायालयात दाद मागणार-नगरसेवक मिर्झा अयाज बेग

खुलताबाद नगरपरिषदेच्या गैरकारभारविरुद्ध,  भ्रष्टाचार प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांचेकडे तक्रार केली. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात त्याबाबत दाद मागितली जाणार आहेत.