खुलताबादच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे साकडे 

खुलताबाद ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- खुलताबाद शहर व तालुक्यातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.  

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुंजाजी नलावडे, आबीद जहागीरदार , तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे, अनिल नलावडे,  शहराध्यक्ष अब्दुल समद , माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी , इक्रमोद्दीन  अमिरोद्दिन यांचा समावेश होता.

खुलताबाद येथे विविध धार्मिक पर्यटन स्थळे असून येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. खुलताबाद शहराच्या तसेच तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी मजबूतीकरण व डांबरीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. खुलताबाद शहरातील नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , नगारखाना गेट ते दर्गा रोड ,  म्हैसमाळ रोड ते आवारे वस्ती या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.