लसीकरण करण्यावर आरोग्य यंत्रणांनी अधिक लक्ष केंद्रित करावे– जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे. त्याचबरोबर चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केल्या.

May be an image of 1 person and sitting

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाने सर्व उपजिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

May be an image of 10 people, people sitting, people standing and indoor

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, रिक्षा चालक, फूल विक्रेते आदींच्या चाचण्या कराव्यात. त्यांनी पहिला लसीचा डोस घेतला असला, तरीही त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. त्याचबरोबर दुसऱ्या डोससाठी नागरिकांना जागृत करावे. जिल्ह्यात जवळपास 19 लाखांहून अधिक लशींचे डोस देण्यात आलेले आहेत. यापुढेही अधिकाधिक प्रमाणात लसीकरण होईल, यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक लसीकरण केंद्रे, मनुष्यबळ, साधनसामुग्री यामध्ये वाढ करावी. याकरीता खासगी दवाखाने, नर्सिंग महाविद्यालये आदींना मदतीसाठी आवाहन करावे. ग्रामीण भागातील कंटेंटमेंट झोन कमी करण्यावर भर द्यावा. दुकान निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन, परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांनीही कोविड 19 चा प्रादुर्भाव होणार नाही, याअनुषंगाने कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, आदी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केल्या.

May be an image of 7 people, people standing, people sitting and indoor

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता टास्क फोर्सने यात्रा, सार्वजनिक गर्दी न होण्यावर निर्बंध कायम असावेत, असे ठरविण्यात आले. डॉ. गुप्ता, श्री. गटणे यांनीही अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

ऑटोरिक्षा चालकांनी शिस्त पाळण्याचे आवाहन

औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात. शहराच्या शिस्तीचे दर्शन ऑटोरिक्षा चालकांच्या पेहरावावरून होत असते. तेव्हा सर्व ऑटोरिक्षा चालकांनी परवाना सोबत बाळगावा, आवश्यक तो ड्रेस परिधान करावा. शासनाच्या सर्व निर्देशाचे पालन करावे. सर्व ऑटो रिक्षा चालकांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

ऊसतोड कामगारांनी ओळखपत्रासाठी ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावेत

औरंगाबाद :  जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामसेवकाकडे नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या त्यांच्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची  जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ यामुळे ऊसतोड कामगारांना मिळणार आहे. ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, जे सतत मागील तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील, त्यांनी संबंधित गाव, वस्ती, तांडा, पाडा व इतर ठिकाणामधील वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना ग्रामसेवकाने ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. यासंबंधीची कार्यवाही ग्रामसेवकांनी पार पाडावी, असेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.


जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा
जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

May be an image of 5 people

औरंगाबाद : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

बैठकीत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1995 अन्वये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. ऑगस्ट  महिन्यात शहर हद्दीत तीन तर ग्रामीण भागात तीन प्रकरणे घडली. यात दोन बलात्कार, दोन विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ इतर एका प्रकरणाचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी दिली. या गुन्ह्यांच्या तपासावर भर द्यावा असे पोलीस विभागाला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सूचना केल्या. या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.