पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

पुणे,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण; सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प राबविले जात आहेत. एकूण रुपये 2215 कोटी किंमतीचे व 221 किमी लांबीचे 22 महामार्ग प्रकल्प यात समाविष्ट आहेत.

प्रकल्पांचे लोकार्पण केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अपघातग्रस्त परिसरामुळे कात्रज भागात उड्डाणपुलाचे महत्त्व आहे, त्यावर आज मार्ग निघत आहे याचा आनंद आहे. या रस्त्यावरील मोठी रहदारी बघता शक्य असल्यास दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. एका चांगल्या संस्थेच्या माध्यमातून या रस्त्याचे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून विशेष अभ्यास करून हा रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय याशिवाय येत्या काही महिन्यात पुणे- सातारा रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

पुण्यातील विकासाचा आढावा घेताना ते म्हणाले की, देशाचे उत्तरेतून दक्षिणकडे होणारे दळणवळण पुण्यात येऊ न देता बाहेरून जाण्यासाठी सूरत-नाशिक–अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट-गुलबर्गा-यादगीर-कर्नूल-चेन्नई हा 40 हजार कोटी रुपयांचा हरित महामार्ग तयार करण्याचे योजिले आहे, यामुळे दिल्ली-चेन्नई 1600 किमी रस्ता 1270 किमी होऊन आठ तासाचा प्रवास कमी होऊन रहदारी आणि प्रदूषण कमी होईल. पुणे-सातारा मार्गावरील संपुष्टात आणलेल्या टोलचे पैसे याकरिता वापरण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

तसेच पुणे ते बंगळुरू हा नवीन हरित महामार्ग (प्रवेश नियंत्रण) बांधला जात आहे. फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू असा हा मार्ग जाईल. पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला गडकरी यांनी यानिमित्ताने दिला.  

पालखी मार्गाचा आढावा घेताना त्यांनी माहिती दिली की, ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा पॅकेजचा, 234 किमी आणि 6710 कोटीचा असून पैकी 3 पॅकेज वर काम सुरू झाले आहे. संत तुकाराम पालखी मार्ग 136 किमीचा असून 4000 कोटी रुयापये खर्च अपेक्षित आहे. लवकरच या मार्गाला सुरुवात होत आहे.

पुणे विभागात विमानतळ, मेट्रो, नदी विकास प्रकल्प तिन्ही विषय मार्गी लागलेले आहेत. पुणे जलद गतीने वाढणारे शहर आहे, इथला विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणे अपेक्षित असल्याचे सांगून गडकरी यांनी पुण्यातील रिंग रोड तसेच उड्डाणपूल महाराष्ट्र शासनाने भू-संपादन जबाबदारी घेतल्यास भारत सरकार कडून बांधले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुणे-तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे–शिरूर या संदर्भात मोठा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करत आहे. ऊनवडी-कडेपठार-बारामती-फलटण हा 34 किमी व जवळपास 365 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे; या प्रस्तावित प्रकल्पाला मंजूरी देऊन या वर्षात काम सुरू होईल असा विश्वास त्यांनी दिला. सातारा-कागल, रत्नागिरी-कोल्हापूर (2100 कोटी खर्चाचे) मार्ग चौपदरीकरण याचाही आढावा गडकरींनी याप्रसंगी दिला.  

या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांची विस्तारीत माहिती:

भूमिपूजन:

राष्ट्रीय महामार्ग 548 डी वरील पुणे शहरातील कात्रज चौक उड्डाणपूल- लांबी 1.326 किमी, किंमत 169 कोटी रुपये.

राष्ट्रीय महामार्ग 60 वरील इंद्रायणी नदी ते खेड मार्गाचे सहापदरीकरण- लांबी 17.17 किमी, किंमत 1269 कोटी रुपये.

पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण:

राष्ट्रीय महामार्ग 548डी वरील शिक्रापूर ते न्हावरा रस्त्याचे सुधारीकरण- लांबी 28 किमी, किंमत 46 कोटी रुपये.

राष्ट्रीय महामार्ग 548डी वरील न्हावरा ते आढळगाव रस्त्याचे उन्नतीकरण- लांबी 48.45 किमी, किंमत 312 कोटी रुपये.

खेड घाट रस्त्याची व राष्ट्रीय महामार्ग 60 वरील खेड-सिन्नर रस्त्यावरील नारायणगाव बायपासची पुर्नरचना- लांबी 9.32 किमी, किंमत 285 कोटी रुपये.

पुणे जिल्ह्यातील केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत रस्त्यांचे सुधारीकरण-

एकूण : 14 रस्त्यांची कामे, 2 पूल, 1 रोपवे 116.40 किमी, 134.18 कोटी रुपये

1. राष्ट्रीय महामार्ग 106 महाड मेढेघाट वेल्हे नसरापूर ते चेलाडी फाटा- 16 किमी, किंमत 4.81 कोटी रुपये.

2. राष्ट्रीय महामार्ग 103 उरण पनवेल भिमाशंकर वाडा-खेड-पावळ-शिरुर- 10 किमी, किंमत 3.91 कोटी रुपये.

3. राष्ट्रीय महामार्ग 126 मुंबई-पुणे रस्ता (वडगाव येथील अंतर्गत रस्ता लांबी) ता. मावळ- 1.90 किमी, 3.99 कोटी रुपये.

4. राष्ट्रीय महामार्ग 134 दौंड (जि. पुणे) ते गार (जि. नगर) वर भिमा नदीवरील पुल- 160 मी, 20 कोटी रुपये.

5. प्र.जि.मा. 62 चांबळी कोडीत नारायणपूर बहिरवाडी काळदरी रस्ता- 12 किमी, 4.91 कोटी रुपये.

6. प्र.जि.मा. घोडेगाव नारोडी-वडगाव काशिंमबेग साकोरे कळंब रस्त्यावरील मोठा पुल ता. आंबेगाव- 140 मी, 7.22 कोटी.

7. प्र.जि.मा. 65 बारामती-जळोची-कन्हेरी लकडी-कळस-लोणी देवकर रस्ता- 15 किमी, 4.91 कोटी.

8. प्र.जि.मा. 114 कारेगाव-करडे-निमोणे रस्ता- 5.60 किमी, 3.93 कोटी रुपये.

9. प्र.जि.मा. 149 ओतूर-ब्राह्मणवाडा रस्ता- 10.50 किमी, 3.90 कोटी रुपये.

10. प्र.जि.मा. 56 हडपसर-मांजरी-वाघोली कॉक्रीट रस्ता- 3.50 किमी, 3.85 कोटी रुपये.

11. प्र.जि.मा. 34 केशवनगर-लोणकर पाडळ-मुंढवा रस्ता- 2.50 किमी, 2.20 कोटी रुपये.

12. प्र.जि.मा. 61 सासवड राजुरी सुपा रस्ता- 6 किमी, 4.91 कोटी रुपये.

13. प्र.जि.मा. 169 वरकुटे (खु.) वडपुरी गलोटे वाडी नं. 2 सरदेवाडी ते रा.म. 65 रस्ता- 6 किमी, 4.91 कोटी रुपये.

14. प्र.जि.मा. 12 वाडा (ता. खेड) घोडा (ता. आंबेगाव) रस्ता- 9 किमी, 2.72 कोटी रुपये.

15. प्र.जि.मा. 31 डेहने नाईफड (ता. खेड) पोखरी (ता. आंबेगाव) रस्ता- 5.50 किमी, 1.97 कोटी रुपये.

16. अ) ग्रा.मा. 66 रा.मा. 103 ते खंडोबामाळ निमगाव रस्ता व ब) प्र.जि.मा. 19 निमगाव दावडी रस्ता- 12.60 किमी, 24.20 कोटी रुपये.

17. निमगाव खंडोबा येथील हवाई रोपवेचे सर्व सोयींसह सुधारीकरण व इतर बांधकामासह रोपवे करणे 31.81 कोटी रुपये.