पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत दमदार स्वागत

वॉशिंग्टन, २३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सकाळी अमेरिकेत दाखल झाले आहेत. ‘मोदी… मोदी…’ अशा गजरात पंतप्रधान मोदी यांचे येथे दमदार स्वागत करण्यात आले. या स्वागतासहच पंतप्रधान मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा सुरू झाला. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. कोरोना महामारीनंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच मोठा विदेश दौरा आहे. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौर्‍यावर गेले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाल्यानंतर विमानतळावर भारतीयांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदी हे क्वाड गटाच्या बैठकीसाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. या बैठकीच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत मोदी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्यो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच बैठक असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान मोदी या आमसभेलाही संबोधित करणार आहेत.


अनिवासी भारतीयांनी सिद्ध केले वेगळेपण : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्यावर अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. अनिवासी भारतीयांनी जगभरात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी या स्वागतानंतर सांगितले. त्यांचे विमान वॉशिंग्टन येथील विमानतळावर उतरल्यानंतर अमेरिकेतील भारतीयांच्या समूहांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत हॉटेलमध्ये संवाद साधला. वॉशिंग्टन येथे माझे उत्स्फूर्त स्वागत केल्याबद्दल मी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो, असे ट्विट करीत त्यासोबत त्यांनी अमेरिकी कंपन्यांमधील भारतीय मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत साधलेल्या संवादाची छायाचित्रे प्रसारित केली.

स्टीफन श्वार्ट्झमन यांची भेट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक स्टीफन श्वार्ट्झमन यांची भेट घेतली.

श्वार्ट्झमन यांनी सध्या भारतात सुरू असलेल्या ब्लॅकस्टोनच्या प्रकल्पाची माहीती पंतप्रधानांना दिली. तसेच आगामी पायाभूत सुविधा व रिअल इस्टेट क्षेत्र यामधील गुंतवणूकीमध्ये ब्लॅकस्टोनला असलेले स्वारस्य यांची माहिती पंतप्रधानांना दिली. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन  आणि राष्ट्रीय चलनीकरण पाईपलाईन यासह भारतातील उज्वल गुंतवणूक संधी याविषयीसुद्धा चर्चा झाली.

जनरल ॲटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल ॲटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांची आज भेट घेतली.भारताच्या संरक्षण क्षेत्राला मजबूती देण्याबाबत त्यांनी चर्चा केली. भारतातील संरक्षण व उभरत्या तंत्रज्ञान उत्पादनाचे क्षेत्र आणि वाढती क्षमता याला कारणीभूत असलेल्या सध्याच्या धोरणात्मक बदलाबाबत लाल यांनी समाधान व्यक्त केले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्स्ट सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विडमर यांची भेट घेतली.भारतातील नवीकरणीय उर्जेबाबतचे चित्र, विशेषतः सौरउर्जेची क्षमता आणि 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा स्रोतांपासून 450 GW वीज उत्पादनाचे लक्ष्य यावर त्यांची चर्चा झाली. स्वतःचे एकमात्र पातळ फिल्म तंत्रज्ञान वापरून भारताच्या नवीन उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या सहाय्याने भारतात उत्पादन सुविधा स्थापन करण्याचा फर्स्ट सोलरच्या उद्देशावरही चर्चा झाली.  तसेच जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग  यावरही चर्चा झाली.

Banner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ॲडॉबीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांची भेट घेतली.ॲडॉबीचे सहकार्य व  भारतातील आगामी गुंतवणूकीच्या योजना यावरही चर्चा केली. डिजिटल इंडिया या भारताच्या महत्वाकांक्षी योजना तसेच आरोग्य, शिक्षण व संशोधन आणि उपयोजन क्षेत्रात उभरत्या तंत्रज्ञानाचा वापर यावरही ही चर्चा केंद्रीत होती.

Banner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियानो अमॉन यांची आज भेट घेतली.या भेटीत भारताच्या दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राने निर्माण केलेल्या गुंतवणूक संधींवर त्यांनी चर्चा केली. यामध्ये इलेक्ट्रोनिक डिझाईन व उत्पादनासाठी नुकत्याच आणलेल्या उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनेवर तसेच सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवरही चर्चा झाली. भारतात नवी स्थानिक संशोधन परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या धोरणांवरही चर्चा झाली.