सिडको वाळूज महानगरचे औरंगाबाद मनपा कडे हस्तांतरण बाबत चर्चा

औरंगाबाद ,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिकेकडे सिडको वाळूज महानगरचे हस्तांतरण लवकरच होणार असून या संदर्भात मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय व सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंढे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली.या भागाच्या मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिकेच्या अंदाज पत्रकात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे आज बुधवारी वाळूज सिडको महानगर मूलभूत सुविधा बाबत चर्चा झाली.यात प्रामुख्याने पाणी पुरवठा ,रस्ते,पथदिवे आणि ड्रेनेज या सुविधांच्या सद्य स्थितीबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय जे विकास कामे आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे त्याचे अंदाज काढून सिडकोने महानगर पालिकेस डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून देण्यात यावे यावर सहमती दर्शविण्यात आली तसेच सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या नागरी सुविधा  रस्ते ,ड्रेनेज लाईन आणि पथदिवे याची देखभाल व दुरुस्ती महानगर पालिका करील. याच प्रमाणे यापुढे नवीन  रेखांकन आणि बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे असतील.यावेळी मनपा प्रशासक पांडेय यांनी वाळूज महानगर येथील देखभाल दुरुस्ती व इतर विकास कामासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतुद ठेवण्याची सूचना संबंधित अधिकारी यांना केली. 

याचबरोबर या भागासाठी पाच हजार पथदिवे राखीव ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.सदरील भागात पाणी पुरवठा संबंधी प्रशासकांनी शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत या भागाचा समावेश  करता येईल असे ते म्हणाले.  याचबरोबर सिडको वाळूज महानगर चे ड्रेनेज लाइन कांचन वाडी एसटीपी प्लांटशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने,शहर अभियंता एस डी पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार,उपायुक्त अपर्णा थेटे,कार्यकारी अभियंता बी डी फड,ए बी देशमुख, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे व इतर सिडको चे अधिकारी यांची उपस्थिती होती.