लाच घेताना फुलंब्री पंचायत समितीतील वरिष्ठ लिपिक अटकेत

फुलंब्री, 21 सप्टेंबर / प्रतिनिधी:- मनरेगा मधील विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना येथील पंचायत समिती मनरेगा विभागातील काम करणारे वरिष्ठ लिपिक संजय पांडुरंग सराटे (वय 47) यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर फुलंब्री पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदाराने आपल्या शेतात मनरेगा मधून विहिर खोदून बांधकाम केले, सदर बांधकाम केलेल्या विहिरी चे पैसे मिळावे यासाठी तक्रारदार यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती फुलंब्री येथे अर्ज केला, त्याप्रमाणे पैसे मंजूर होऊन मिळण्याकरता वरिष्ठ लिपिक सराटे यांना भेटले असता माझे बिल मंजूर करा अशी विनंती केली, मात्र सदर शेतकऱ्यास सराटे यांनी चार हजार रुपयांची मागणी केली, तडजोडी अंती ही रक्कम अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. हा सर्व प्रकार या शेतकऱ्याने लाच लुचपत विभागाशी संपर्क करून त्यांना कळविला त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून सराटे यांना अडीच हजार रुपये देताना रंगेहात पकडले व त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदविला आहे.
पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलिस अधिकारी दिपाली निकम हवालदार बाळासाहेब राठोड, सुनील पाटील यांनी या सापळ्यात मदत केली आहे.