विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणला सरपंचांचे साकडे

फुलंब्री, 21 सप्टेंबर / प्रतिनिधी :- तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर पंपाचा विद्युत पुरवठा अचानक खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी तालुक्यातील सरपंचांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा अतुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला मंगळवार (21 सप्टेंबर ) निवेदन दिले आहे.

फुलंब्री तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या अधिनस्त असलेल्या पाणी पुरवठा योजने करीता आपल्या कार्यालयाच्या मार्फत विद्युत जोडणी करण्यात आलेली असून ग्रामपंचायती मार्फत पाणी पट्टीची वसुलीच्या रकमे मधून सदर विद्युत देयकाची अदायगी करण्यात येते मात्र फुलंब्री तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेचा लाभ घेतलेल्या रहिवासी यांनी बहुतांश पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे वीजबिल भरताना ग्रामपंचायतीस अडचण निर्माण होते त्याच प्रमाणे काही ग्रामपंचायतीने बीज बिलपोटी 25 %रक्कम भरली असताना देखील त्याची कुठलीही नोंद न घेता संपूर्ण रक्कम दर्शवली जाते हा सावळा गोधळ कुठेतरी थाबवा व या अदायगी   बाबतीत वरिष्ठ स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊन विद्युत देयकांची जिल्हा परिषदे मार्फत निर्णय होऊ शकतो. वीजबिल थकबाकी पोटी तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायतींना कोणतीह सूचना न देता महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर कनेक्शन कट केले असल्याने गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करणे अवघड झाले आहे. ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाचे कनेक्शन तात्काळ जोडून देण्यात यावे नसता  महावितरण कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदना द्वारेे इशारा दिला आहे.यावेळी जिल्हा परीषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती सभापती सविता फुके, पंचायत समिती माजी सभापती सर्जेराव मेटे, अभिषेक गाडेकर, सरपंच सरला संतोष तांदळे, सरपंच कृष्णा गावंडे, संतोष तांदळे, फारूक शेख, कांताबाई जाधव, जगन दाढे, अर्चना जाधव, कांताबाई म्हस्के, मंगेश जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.