दिवाणी न्यायाधीश परीक्षा शनिवारी

औरंगाबाद,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी  प्रथम वर्ग मुख्य परीक्षा शनिवार, 25 सप्टेंबरला शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात होणार आहे. परीक्षेसाठी एकूण 456 उमेदवारांना आयोगामार्फत प्रवेश देण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 याप्रमाणे आहे. परीक्षेकरिता एकूण 63 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे.

            परीक्षेकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना कोविड -19 विषाणूच्या अनुषंगाने Extra Protective Kit, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांकरीता Basic Covid Kit व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरिता पीपीई कीट आयोगामार्फत पुरविण्यात येणार आहे.

            अंशत:लॉकडाउनच्या अनुषंगाने उमेदवार व त्यांचे पालक यांना आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे वितरित केलेले प्रवेश प्रमाणपत्र प्रवासाचा पास म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा इतर परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्या पुराव्याकरिता आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक जवळ बाळगणे व तसेच तपासणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहील.

            परीक्षेच्या कामाकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे नेमणुकीचे आदेश 25 सप्टेंबरला प्रवासाकरिता पास म्हणून ग्राहय धरण्यात येतील. तथापि, त्यासोबत संबंधितांनी मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे व तपासणीच्यावेळी सादर करणे अनिवार्य असेल, असे जिल्हाधिकरी कार्यालयाने कळविले आहे.