शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास विलंब,प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वत:चे डोके फोडले

फुलंब्री, 21 सप्टेंबर / प्रतिनिधी :- तालुक्यातील वडोद बाजार येथील महाराष्ट्र बँकेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास विलंब होत असून परिणामी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी प्रहार संघटनेच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सोमवार ( 20 सप्टेंबर )  ढोल बजाओ आंदोलन करत असताना पोलिसांसमोर  खिशातील दगड काढुन एका कार्यकर्त्यांने स्वत:चे डोके फोडुन घेतले.

Displaying IMG-20210921-WA0046.jpg

वडोद बाजार येथील महाराष्ट्र बँकेत काही शेतकऱ्यांना बँकेतील कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात पैसे व वेळ वाया जात असून यात बँकेत काही कागदपत्र गहाळ होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली, याबाबत प्रहार संघटनेचे मंगेश साबळे यांनी याबाबत महाराष्ट्र बँकेत शनिवारी निवेदन देवून बँकसमोर सोमवारी आंदोलन करणार होता. प्रहार संघटनेचे मंगेश साबळे याने ढोल घेवून सोमवारी बँकेसमोर सकाळी अकरा वाजता शेतकऱ्याच्या पीक कर्ज वाटप करण्यास विलंब होत असल्याने ढोल बजाव आंदोलन करीत स्वतःचे डोके फोडून घेतले आंदोलन स्थळी असलेले वडोदबाजार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद पवार, शाखा व्यवस्थापक वैशाली सिंघल, पोलिस  चव्हाण यांनी  मंगेश साबळे याला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्याबाबत चर्चा करीत असताना त्याने ढोल वाजवत  खिशात ठेवलेला दगड डोक्याला  मारत डोके फोडून घेतले. 

—————————————-


अडवणूक केली जात नाही

मी एक महिना भरापूर्वीच येथे रुजू झाले आहे येथे आल्यापासुन शेतकऱ्यांची बँकेतील पिक कर्ज वाटपाचे काम सुरू असुन ज्या शेतकऱ्यांना पिक कर्ज  बाबत  मागणी केली आहे त्यांच्या  कागदपत्रांची तपासणी करून काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांशी संवाद साधला जात  आहे कर्ज वाटप सुरू आहे बँक शेतकऱ्यांसाठी आहे .व आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी आहे. काम करण्यासाठी काही वेळ लागतो मलाही काही नियमांचे पालन करावे लागते. कोणत्याही शेतकऱ्याची पीक कर्ज वाटप संदर्भात अडवणूक केली जात नाही.

वैशाली सिंघल, व्यवस्थापक ,बॅंक ऑफ महाराष्ट्र वडोद बाजार शाखा 

———————————————————-


मंगेश साबळे याला लगेच पोलिसांनी पकडले व वडोद बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले त्याच्या डोक्याला खरचटले असून त्याच्यावर  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.