तैलचित्रातून कर्तृत्व – इतिहासाचे स्मरण घडते-न्या. नरेंद्र चपळगावकर

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पूर्णाकृती तैलचित्र अनावरण

औरंगाबाद ,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचा साधेपणा, मनाचा मोठेपणा, तत्त्वनिष्ठेसोबतच जपलेली रसिकता- कलासक्त मन हे व्यक्तिपैलू गोविंदभाई श्रॉफ यांची उंची जपतात. अशा कर्तृत्वशाली व्यक्तींचे स्मरण राहावे यासाठी तैलचित्राची आवश्यकता असते, असे प्रतिपादन माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केले. निमित्त होते सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद आयोजित पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पूर्णाकृती तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाचे.

गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात दि.17 सप्टेंबर 2021 रोजी तैलचित्राचे अनावरण मा.न्या.नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात विश्वनाथ दाशरथे यांनी सादर केलेल्या आणि प्रा. अश्विनी यार्दी यांनी रचलेल्या संस्कृत श्लोकाने करण्यात आली.       

यावेळी उद्घाटक म्हणून संवाद साधताना श्री.चपळगावकर यांनी गोविंदभाईंच्या सहवासातील विविध प्रसंगांमधून त्यांचे मोठेपण विशद करून आठवणी जागवल्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील, व विविध कार्यांमधील त्यांचे योगदान स्पष्ट केले.   प्रास्ताविकात संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिनेश वकील यांनी भाईंचे विद्यार्थी जीवन, शिक्षक म्हणून केलेले कार्य यांसह त्यांच्या त्यागमय जीवनाचे प्रसंग विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष राम भोगले म्हणाले की, भाई जेव्हा कार्यरत होते तेव्हा सरकारला धोरणे बदलावी लागत ही भाईंची ताकद. संस्थेच्या हिताचे कालानुरूप निर्णय घेताना भाईजींनी जपलेल्या मूल्यपंरपरेचे भान ठेवून काम करू अशी ग्वाही दिली.त्यांनी स.भु. शिक्षण संस्थेतील त्यांच्या परिपक्व शैक्षणिक नेतृत्वाचे, निर्णयक्षमतेचे विविध प्रेरक संदर्भ दिले.     

सरचिटणीस, डॉ.नंदकुमार उकडगावकर यांनी भाईंच्या आठवणी जागवत आभार व्यक्त केले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ.माधव गुमास्ते, कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, सहचिटणीस मिलिंद रानडे, ज्येष्ठ सदस्य डॉ.सुधीर रसाळ, प्रशांत देशपांडे, अॅड. रामेश्वर तोतला, साधना शाह, ज्ञानप्रकाश मोदाणी, ओमप्रकाश राठी, कमलाकर व्याहाळकर, प्रताप बोराडे, प्रमोद माने, प्रसाद कोकीळ, ओमप्रकाश वर्मा  यांच्यासह संस्थेचे विविध मान्यवर, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वृंदा देशपांडे -जोशी यांनी केले.