पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे सेवा व समर्पण अभियान

 मुंबई ,१६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात  सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सचिव संदीप लेले , दिव्या ढोले, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील , उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी  यावेळी उपस्थित होते. या अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. 

          श्री. पुरोहित  व उपाध्ये यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब वर्गाची सेवा करण्याचा विचार प्रत्यक्षात आणला आहे. त्यामुळे या अभियानात सेवा कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.  प्रत्येक मंडलात:– दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरण यांचे वितरण करणे,  प्रत्येक जिल्ह्यातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये व वृध्दाश्रमांना भेट देऊन फळांचे वाटप करणे,  जिल्हा/मंडल  स्तरावर आरोग्य तपासणी शिबिर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन किटचे वितरण, रक्तदान शिबिर, सर्व मंडलांमध्ये स्वच्छता कार्यक्रम,प्लास्टिक निर्मूलन मोहिम असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या खेरीज विविध स्वरूपाचे सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान  या नात्याने जनसेवक म्हणून 20 वर्ष पूर्ण करत आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले.  या अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये सेवा कार्याचे महत्व व राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत करायची आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पीएम केअर्समधून साह्य देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोदी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रसार या अभियानात केला जाणार आहे. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांशी संपर्क साधला जाणार आहे, असेही श्री . पुरोहित यांनी सांगितले.

          या अभियानाचे  बूथस्तरीय कार्यक्रम प्रमुख आ. रामदास आंबटकर, अरविंद निलंगेकर पाटील असून पर्यावरण :- अॅड. माधवी नाईक, आरोग्य – डॉ.अजित गोपछडे, सेवाकार्य -जयप्रकाश ठाकूर, प्रसिद्धी – माधव भांडारी, केशव उपाध्ये, सोशल मीडिया – स्वानंद गांगल अशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.