संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर दि. १५ : कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे आहे. नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथपर्यंत कडवी संरक्षण विषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रक्षा, आंतरिक कौशल्य या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भविष्यात गुंतवणूक होणाऱ्या नागपूर सारख्या शहरात यासाठी अभ्यासक्रम सुरू होतो, ही अभिमानास्पद बाब  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम,अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. दत्तात्रय वाटमोडे उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह देऊन कुलपती व अन्य मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

नागपूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या परिसरात पुढील काळात संरक्षण विषयक निर्मिती क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कौशल्ययुक्त मणुष्यबळासोबतच संरक्षण तज्ज्ञही विद्यापीठात घडावे, अभियंते, तंत्रज्ञ, अभ्यासकही निर्माण व्हावे, प्रधानमंत्र्यांनी देखील हीच अपेक्षा  व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.

विद्यापीठाला निधीची कमी पडू देणार नाही. यासाठी गरज पडल्यास देश-विदेशातून निधी उभारल्या जाऊ शकतो. मात्र देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे अतिशय आवश्यक असून त्यादृष्टीनेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात आहे. एकूण 11 नवे अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठ सुरू करीत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. परिसरात मोठ्या प्रमाणात आयुध निर्माणी आहेत. या ठिकाणी कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची आवश्यकता कायम असते. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे लक्ष दिले जात आहे. कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात विद्यापीठाने सुरू केलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.

महापौर दयाशंकर तिवारी यांनीही संबोधित केले. परिस्थिती उद्भवली तर पत्थर सारे बँम्ब बनेगे, असे सूतोवाच राष्ट्रसंतानी केले होते. त्यांच्या नावाने असणाऱ्या या विद्यापीठात संरक्षण खात्याला बळकटी देणारा अभ्यासक्रम सुरु होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

अभ्यासक्रम असा आहे नव्याने सुरू होणारा अभ्यासक्रम

कौशल्य विकासावर आधारित आहे. आयटीआय, पदविका, पदवीधारक यांच्यासोबतच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हे एकूण 11 अभ्यासक्रम (कोर्सेस) आहे. या अभ्यासक्रमांमुळे विविध आयुध निर्माण क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रक्षा व अंतरिक्ष तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्र व पदविका असे या 11 अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल. विद्यापीठाचे संचालक, विद्यार्थी कल्‍याण यांच्याकडे या अभ्यासक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी कर्मिन्स कॉलेज नागपूर येथील प्राचार्य डॉ. भारत भूषण जोशी व रक्षा अंतरिक्ष तंत्रज्ञानातील अनेक तज्ज्ञांचे सहकार्य यासाठी लाभत आहे. या वर्षी पासून हा अभ्यासक्रम सुरु होत असून कौशल्य आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे दहावी, बारावी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा), पदवी (अभियांत्रिकी व अन्य डीग्री) व मध्येच शिक्षण सोडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो.प्रत्येक अभ्यासक्रमासाठी तूर्तास तीस जागांचे नियोजन असून अधिक प्रतिसाद मिळाल्यास यामधील जागा वाढू शकतात.

या कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच फ्रान्स येथील सुरक्षाविषयक उद्योग समूहाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय मुदगल यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्र-कुलगुरू संजय दुधे यांनी केले.