पर्यावरण रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक योगदान द्यावे : राज्यपाल

राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

मुंबई, जलस्त्रोत, नदी, पर्वत व जंगले यांच्याप्रति भारतीय लोकांमध्ये अनादी काळापासून पावित्र्याची व आदराची भावना होती. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ही भावना कमी होऊन पर्यावरणाचे सर्वत्र शोषण होत आहे. काही ठिकाणी जंगल माफियादेखील कार्यरत आहेत. अशा वेळी पर्यावरण वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी नागरिकांनी अधिकाधिक योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

वन व पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील 30 व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन येथे पर्यावरण मित्र सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गऊ भारत भारती व पुणे येथील कर्नाळा चारिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

कर्नाळा ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत शहासने, गऊ भारत भारतीचे अध्यक्ष संजय शर्मा ‘अमान’, वनसेवेतील अधिकारी रंगनाथ नाईकडे व नंदिनी शहासने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते चंद्रकांत शहासने लिखित ‘पर्यावरण विचार’ व दिवंगत डॉ. ब्रह्मशंकर व्यास लिखित ‘गंगा महात्म्यम्’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

वन विभागाचा पर्यावरणाशी सर्वात जवळचा संबंध येतो. मात्र तेथील कर्मचारी-अधिकाऱ्यांचा वनांशी संबंध नोकरीपुरताच येत असतो. त्याउलट शेतकऱ्यांचा निसर्गाशी चोवीस तास संबंध असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व अशिक्षित महिला देखील पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील असतात. ही संवेदनशीलता व निसर्ग प्रेम नव्या पिढीमध्ये रुजवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेले महादेव जयराम, ‘मी पुणेकर’ अभियानाचे पराग श्रीपतराव मते, दिलीप त्र्यंबक शेलवंते, जयसिंग रंगनाथ जावक, गोरख दगडे पाटील, प्रीतम जनार्दन महात्रे, यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, पुंडलिक थोटवे, डॉ.नागेश कल्याणकर, संजय मनोचा, डॉ.शगुन गुप्ता, पुनीत कुमार वोरा, हेमंतकुमार तान्तिया, आयआरएस, जितेंद्र कुमार सारंगी, मोनिका मीना, निकेश ताराचंद शाह जैन, विशाल भगत, डॉ. राजेश सी. डेरे (फॉरेन्सिक मेडिसिन विभाग प्रमुख), अजय कौल, हिम बहादूर सोनार, पत्रकार, दार्जिलिंग, डॉ. खालिद शेख (साई हॉस्पिटल), डॉ.विरल सखीया, आकाश शाह, प्रियांक शहा, वृंदा विजय लाठी, सुखदेव यादव, माणिकांत तिवारी, पंकज पांचाळ, नंदिनी शहासने व प्रेम कुमार यांना सन्मानित करण्यात आले.