कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अपघात कमी करण्यासाठीच्या ‘आय-रस्ते’ या उपक्रमाचा नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर,११ सप्टेंबर /प्रतिनिधी :-नागपूर शहरात दरवर्षी पंधराशेच्या वर दुर्घटना होऊन २५० मृत्यू होतात. प्रत्येक अपघाताला फक्त ड्रायव्हरला जबाबदार धरणे चुकीचे आहे, या अपघाताला रस्ते अभियांत्रिकी, रस्त्याचा दर्जा तसेच संबंधित यंत्रणा तितक्याच जबाबदार आहेत . बांधकाम विभाग , रस्ते विभाग, पोलीस, परिवहन विभाग  तसेच सामाजिक संघटना या सर्वांनी समन्वय  साधून अशा घटना प्रती आपली संवेदनशीलता दाखवायला पाहिजे, अपघात कमी करायला मदत केली पाहिजे असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं .

नागपूर महानगरपालिका ,सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट आयआयटी हैदराबाद ,इंटेल तसेच महिंद्रा आणि महिंद्रा  या  उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्या  सहकार्यातून साकारण्यात आलेल्या तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणाऱ्या ‘आय- रस्ते’ या पथदर्शी प्रकल्पाचा नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरात शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे,  सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक सतिश चंद्रा इंटेलचे प्रमुख निवृत्ती राय महिंद्रा अँड महिंद्रा चे श्रीकांत दुबे उपस्थित होते.

अपघात टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास इंटेलिजन्स ट्राफिक ,टेक्नॉलॉजी ड्रायव्हर वॉर्नर सिस्टिम तसेच इतर तांत्रिक गोष्टी होण्यास मदत मिळणार असून  अपघात कमी होण्यास आणि  रस्ते  सुरक्षा सुधरण्यास  मदत होईल असेही गडकरी यांनी सांगितलं. नागपूर शहरामध्ये क्रॅश सेवेएरिटी रेशो मध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे मुंबई पेक्षा ही जास्त झालेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

जल, वायू प्रदूषण सोबतच ध्वनी प्रदूषण कडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून   कर्कश  हॉर्नचे  आवाज आता भारतीय वाद्याच्या  व संगीताच्या  सुमधुर आवाजात वाजतील अशी यंत्रणा आपण तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात दरवर्षी दीड लाख अपघात होतात या अपघातांची संख्या 2025 पर्यंत 50 टक्क्यांवर आणण्याचे ध्येय आपला आहे ,रस्त्याची गुणवत्ता,सूरक्षा  मानके यात एक आदर्श आपल्याला  प्रस्थापित करायचा आहे असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभाग हा रस्तेबांधणी मध्ये रोज नवे विश्वविक्रम तयार करत आहे. एअरस्ट्रिप महामार्गावर तयार करून  संरक्षण दलाचे हवाई जहाज तसेच कुठल्याही मेडिकल इमर्जन्सी साठी ॲम्बुलन्सच्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी या  एअ‍रस्ट्रीपचा  उपयोग   होईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

या कार्यक्रमाला  नागपूर महानगरपालिका, आयआयटी – हैदराबाद,   इंटेल,  महिंद्रा अँड महिंद्राचे अधिकारी  तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.