‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या संशोधकाचा जागतिक पातळीवर सन्मान

नांदेड ,११ सप्टेंबर /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलातील डॉ. विजयकुमार जाधव व डॉ. विजयकिरण नरवाडे यांची अनुक्रमे विद्यापीठ इतिहासात प्रथमच ब्रिक्सच्या माध्यमातून तरुण शास्त्रज्ञ व डी. एस. कोठारी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Displaying IMG-2484-2-s.jpg

पाच देशांच्या संकल्पनेतून साकार झालेली ब्रिक्‍स ही संशोधन क्षेत्राला चालना देणारी आंतरराष्ट्रीय संकल्पना आहे. या संकल्पनेतून दरवर्षी ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशाच्या वतीने एका देशामध्ये तरुण शास्त्रज्ञांना निमंत्रित केले जाते. आजपर्यंत या अंतर्गत पाच बैठका पूर्ण झाल्या आहेत. या बैठकांमध्ये त्या-त्या देशाचे पंतप्रधान प्रतिनिधित्व करतात. भारत देशामध्ये या अगोदर २०१६ साली ही परिषद बेंगलोर येथे पार पडली. २०२०-२१ या वर्षी बेंगलोर येथे होणाऱ्या अभासी बैठकीमध्ये भारतातून २० संशोधकांची निवड झालेली आहे. डॉ. विजयकुमार जाधव महाराष्ट्रातून तसेच विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच निवड झालेले संशोधक आहेत. ही परिषद अभासी प्रक्रियेद्वारे १३ सप्टेंबर, २०२१ रोजी बेंगलोर येथे पाच देशांच्या संशोधका बरोबर पार पडणार आहे.

डॉ. विजयकिरण नरवाडे यांची विद्यापीठ परिक्षेत्रामधून प्रथमच डॉ. डी. एस. कोठारी या भारत सरकारच्या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. डॉ. नरवाडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इरासमुस-मुंडूस फेलो म्हणून युरोपियन देशामध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते एनएसपी स्लोवाकीया या देशाची शिष्यवृत्तीचे दोन वेळचे मानकरी आहेत. डॉ. डी. एस. कोठारी शिष्यवृत्ती अंतर्गत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे संशोधन कार्य करणार आहेत.

या उत्तुंग यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दोघांचाही सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी  भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. एम. के. पाटील, प्रा. कुंभारखाने, प्रा. राजाराम माने, प्रा. महाबोले, डॉ. सरोदे, डॉ. बोगले तसेच इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून दोघानाही भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.