माहेरचा आहेर सन्मान सरदार जाधव यांना घोषित

औरंगाबाद, ११ सप्टेंबर /प्रतिनिधी :-उंडणगाव मित्र मंडळाच्या वतीने २०१३ पासुन माहेरचा आहेर हा सन्मान औरंगाबाद जिल्ह्याचे भुमीपुत्र असलेल लेखक कलावंत गायक अभिनेते कवी यांना बहाल करण्यात येतो. यावर्षी चित्रकार कथा कादंबरीकार सरदार जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत बब्रुवान रूद्रकंठावार, रवी कोरडे, पद्मनाभ पाठक, विनित भोंडे, ज्ञानेश्वर उंडणगांवकर आणि विश्वनाथ दाशरथे या सहा जणांना या सन्मानाने पुरस्कृत केल्या गेले आहे. 
औरंगाबाद येथे शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. ७ वा कलश मंगल कार्यालयात हा सन्मान सुप्रसिद्ध लेखक कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते समारंभपुर्वक सरदार जाधव यांना बहाल करण्यात येणार आहे.
या निमित्त दर्जेदार मराठी कवितांचा कार्यक्रम रसयात्रा सादर होणार आहे. रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव असा मराठी कवितेचा सुंदर प्रवास इंद्रजीत भालेराव, दासु वैद्य, रवीशंकर झिंगरे, श्रीकांत उमरीकर, विश्वनाथ दाशरथे हे मांडणार आहेत.
उंडणगांव मित्र मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती संयोजक विजय नाईक यांनी पत्रकारांना दिली.
बैठकीसाठी संयोजन समितीचे सुधीर महाजन, डाॅ. राजेंद्र धनवई, अॅड. मिलिंद महाजन, निलेश महाजन, आर्किटेक्ट अनिरूद्ध नाईक, विजय नाईक व श्रीकांत उमरीकर हे उपस्थित होते.