मानवावर अनंत उपकार करणाऱ्या ऋषींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!:ऋषीपंचमी

षि किंवा मुनि म्हटले, की आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपले मस्तक आदराने झुकते. या भरतखंडात अनेक ऋषींनी विविध योगमार्गांनुसार साधना करून भारताला तपोभूमी बनवले आहे. त्यांनी धर्म आणि अध्यात्म यांविषयी विपुल लिखाण केले आहे अन् समाजात धर्माचरण आणि साधना यांचा प्रसार करून समाजाला सुसंस्कृत बनवले आहे. आजचा मनुष्य प्राचीन काळातील विविध ऋषींचा वंशजच आहे; परंतु मनुष्याला याचा विसर पडल्यामुळे त्याला ऋषींचे आध्यात्मिक महत्त्व ज्ञात नाही. साधना केल्यावरच ऋषींचे महत्त्व आणि सामर्थ्य समजू शकते. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला ‘ऋषिपंचमी’ म्हटले जाते. या दिवशी ऋषींचे पूजन करण्याचे व्रत धर्मशास्त्रात सांगितले आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात ऋषीपंचमीचे महत्त्व, हे व्रत करण्याची पद्धत आणि याविषयीची अन्य माहिती जाणून घेऊया. मानवाच्या सर्वांगीण कल्याणार्थ जीवन व्यतीत केलेल्या ऋषिमुनींच्या चरणी कोटीश: प्रणाम !

Displaying Hrushipanchami.jpg

1. ऋषी : कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी.

2. उद्देश – ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही न्यून होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने न्यून होतो.)
3. व्रत करण्याची पद्धत – या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.  पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे. दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे. बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला आडकाठी नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.

4. महत्त्व : ‘ऋषीपंचमीचा दिवस हा ‘वेददिन’ म्हणून मानला गेला आहे. या दिवसाचे महत्त्व असे की, ज्या प्राचीन ऋषींनी समाजाचे धारण आणि पोषण सुव्यवस्थित व्हावे, यासाठी आपले सर्व जीवन त्यागपूर्ण करून वेदांसारखे चिरकालीन वाङ्मय निर्माण केले, संशोधनात्मक कार्य केले, समाज-नियमने निर्माण केली, त्यांचे ऋणी राहून कृतज्ञताबुद्धीने स्मरण करण्याचा हा दिवस आहे.’

5. इतर माहिती : नागांना ऋषि म्हणतात. एका बाजूला स्त्री आणि दुसर्‍या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषिपंचमीला खातात. ऋषिपंचमीला जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषिऋण फेडण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात. व्याहृती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात.

संकलन- दत्तात्रेय वाघूळदे

(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)