टीएम म्युझिक अकादमी व प्रॉडक्शन हाऊसचे औरंगाबादला उद्घाटन

औरंगाबाद,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :- ज्येष्ठ सिने संगीतकार शैलेंद्र टिकारीया यांच्या टीएम म्युझिक अकादमी व प्रॉडक्शन हाऊसचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे, गझल गायक व संगीतकार अतुल दिवे यांची उपस्थिती होती.

टीएम म्युझिक अकादमी व प्रॉडक्शन हाऊसचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

संगीतकार अतुल दिवे यांनी सांगीतले की शैलेंद्र टिकारिया गेल्या ४० वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. मंगेशकर कुटुंबियांपासून ते आजचे प्रसिद्ध गायक शान, वैशाली माडेे अशा नामवंत गायकांसोबत ते आजही संगीतकार म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या या दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.

डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी या प्रकल्पाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकाच छताखाली संगीतविषयक आणि तंत्रज्ञानविषयक सुविधा उपलब्ध झाल्याने, शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात ही मोलाची भर ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संगीतकार ए. आर. रहमान यांचे शिष्य सिद्धांत टिकारीया हे या प्रॉडक्शन हाऊसचे काम पाहात आहेत. या अत्याधुनिक स्टुडिओद्वारे शहरात दर्जेदार प्रॉडक्शन सुविधेसोबतच ताज्या दमाच्या कलावंतांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा मानस शैलेंद्र टिकारिया यांनी व्यक्त केला. शहरातील अग्रगण्य अशा स्वर साक्षी आणि एएमडी स्टुडिओसोबत टीएम म्युझिक संयुक्तपणे भरीव कामगिरी करेल असे त्यांनी सांगीतले.

उद्घाटन समारंभाला विजय राऊत, गायिका वैशाली राजेश, वर्षा जोशी, वैशाली कुर्तडीकर, मनीष गायकवाड, वीराम आव्हाड, अक्षय भुरेवाल, स्वाती कुलकर्णी, वैभव पांडे, गायक प्रमोद सरकटे, विनोद सरकटे, डॉ. महेंद्र वाव्हळ, विजय ज्ञानेश्वर शिन्दे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा रूपल यांनी केले.अमित निर्मल यानी आभार मानले.