राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सरदार इक्बाल सिंग लालपुरा यांनी स्वीकारला

सर्व वर्गांच्या सक्षमीकरणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम प्रत्यक्षात दिसत आहेत- मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली, १० सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून आज नवी दिल्ली येथे सरदार इक्बाल सिंग लालपुरा यांनी केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना नक्वी यांनी लालपुरा यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Image

प्रशासन, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ यांच्याशी असलेली बांधिलकी बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा नक्वी यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व स्तरांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम प्रत्यक्षात दिसू लागले आहेत, असे ते म्हणाले. 1984 च्या दंगलग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली, असे त्यांनी सांगितले. कर्तारपूर मार्गिकेची बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली मागणी सरकारने पूर्ण केली आणि प्रवाशांना देशाबाहेरील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी उपयुक्त असलेली गुरुद्वारा सर्किट ट्रेन सुरू करण्याचा देखील सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लोकांची सेवा करण्याची संधी पंतप्रधानांनी आपल्याला दिली आहे आणि आपण त्याद्वारे लोकांची उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही लालपुरा यांनी यावेळी दिली.