खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचे खते, बी-बियाणे व पिक कर्जाबाबत अडचणी सोडविण्यास प्राधान्य- कृषी मंत्री दादाजी भुसे

बीड, दि. २२:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये खते, बी बियाणे आणि पीक कर्ज मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जावे यासाठी संबंधित शासकीय विभागांनी चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात कृषि मंत्री श्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे , जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शिवाजी बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कृषि मंत्री श्री भुसे म्हणाले शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला पाहिजे यासाठी बँकांनी व संबंधित शासकीय विभागाने पुढाकार घेऊन लाभ मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात तसेच खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्जा मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. ते पुढे म्हणाले कृषी यंत्रणेने शेतकर्यां बरोबरचे संबंध चांगले ठेवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे तसेच रासायनिक खते यांचा पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे यासाठी कृषी विभागाने काळजी घ्यावी कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानदारांनी शासनाच्या सूचनांनुसार दुकानाच्या दर्शनी भागांमध्ये फलक लावून दुकानात असलेल्या कृषी मालाचा साठा व त्यांचे दर लिहिलेले पाहिजे व येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास उपलब्ध करून दिले पाहिजे याबाबत जर शेतकऱ्यांची तक्रार येत असेल तर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल असे निर्देश श्री दादाजी भुसे यांनी दिले.

सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर उगवले नाही याची जबाबदारी संबंधित बियाणे पुरवठा दाराचे राहील याची संपूर्ण चौकशी कृषी विभागाच्या कडून केली जाणार आहे ाबरोबरच शेतकर्‍यांचा अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचे सूचना देण्यात आल्या असून कोणतीही तक्रार राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कृषी मंत्री यांनी जिल्ह्यातील खरीप पीक पेरणी क्षेत्राची माहिती घेऊन बियाणे मागणी व पुरवठा रासायनिक खतांचे नियोजन थेट बांधावर खत पुरवठा तालुकानिहाय कृषी निविष्ठा केंद्रांची संख्या भरारी पथकांची स्थापना या अनुषंगाने झालेली कार्यवाही तसेच पीक कर्ज वाटप व या विविध बाबींचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाची स्थिती पंधरा दिवसात सुधारण्यात येईल असे सांगून बी बियाणे व खतं बाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल यासाठी संबंधित विभाग तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या दृष्टीने झालेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली, यामध्ये जिल्ह्यातील पर्जन्यमानाची माहिती पीक कर्ज वाटप ची माहिती खरीप पिकाखालील क्षेत्र ची व प्रमुख पिकाची माहिती देण्यात आली जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी पेरणी झालेले क्षेत्र सांगण्यात आले यामध्ये एकूण 5 लक्ष 21हजार 846 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण 71.73 टक्के आहे यामध्ये सोयाबीन 1 लाख 73 हजार 227 कापूस 2 लाख 58 हजार 316 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेले आहे.

यावेळी सादर केलेल्या माहिती व शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने कृषिमंत्री श्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे थेट निर्देश दिले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील , कृषी विभागाचे विष्णू मिसाळ यासह श्री कुंडलिक खांडे , श्री सचिन मुळुक , विविध बँक अधिकारी, सहकार व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *