“देवा तूंचि गणेशु सकळमति प्रकाशु”

रवींद्र तुकाराम मालुसरे

भारताचे लक्षवेधी सांस्कृतिक वैशिष्टये ठरलेला आणि मुख्यतः महाराष्ट्रासह सध्या देशापरदेशात भूषणावह असलेला व १२८ वर्षाची परंपरा लाभलेला वार्षिक सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने आणि उत्साहाने सुरु होत आहे. जगभर घोंगवणारे भीतीचे सावट असलेले कोरोना संकट थोडेसे सुसह्य झाले असले तरी ते सार्वजनिक निष्काळजीपणामुळे ते केव्हाही गडद होईल ही चिंतेची बाब आहेच. श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते आपल्या प्रिय गणरायाच्या आगमनाचे. बाप्पा नुसता आठवला तरी मन कसं प्रसन्न होतं.

Ganapati Poster

उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती ही उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे तर प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः ही  आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभप्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते. श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा पूर्वापार परंपरा आहे. 
 गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी व लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश ही  विद्येची देवता !  साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश ही  अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला ‘गणपती’ हे अधिदान प्राप्त झालेले आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला ‘वरदा चतुर्थी’ असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.

Ganpati Bappa Morya - Ganesh Chaturthi - Vinayaka Chaturthi - Abhibus Blog


शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान,कथेकरी,हरिदास यांचे व शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार व दरबारी  प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव इतमामाने होत असे.

Mixcloud


इ स १८९२  मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले,  श्री धोडवडेकर व श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित होवून ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल ही  कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसेच  राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता ही  साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात  सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक व आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो.

Lord Ganesha Ganapati Statue - Free photo on Pixabay

लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामागे मुख्यतः लोकशिक्षण आणि समाज जागृती  हाच एकमेव उद्देश होता. शिवाय या सार्वजनिक उत्सवामध्ये समाजातील सर्व जाती-धर्माचे,श्रीमंत-गरीब अशा विविध समाज घटकांनी गुण्यागोविंदाने एकत्र यावे आणि सलोखा,सहकार्य आणि बंधुभावाचा नात्याने परस्परातील नाते घट्ट होऊ शकेल असाही  या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा त्यांचा विधायक हेतू होता. सश्रद्ध भावनेने साजऱ्या भावनेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला लोकमान्यांचा खरा उद्देश लोकशिक्षण आणि लोकजागृती असाच होता. आणि त्याच कारणास्तव उत्सव काळामध्ये दहा दिवस समाजसुधारक,विचारवंत,अभ्यासक यांची व्याख्याने होऊ लागली. अर्थात त्या भाषणाचा अंतस्थ हेतू सामान्य जनतेला पारतंत्र्याचे तोटे आणि स्वातंत्र्याचे फायदे समजावून सांगणे हाच होता. यथावकाश अशा वैचारिक प्रबोधनाचा, समाज जागृतीच्या मार्गदर्शक उपक्रमांमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांची भर पडली.

स्वातंत्रोत्तर काळात मात्र यथावकाश लोकशिक्षण आणि लोकजागृती ही उद्दिष्टये क्षीण होऊ लागली.टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक,न चि. केळकर, नाट्याचार्य खाडिलकर,काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम. अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे.  पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे ह.भ. प. सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार,  सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत,  वक्ते,  कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर, गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. प्रथम या उत्सवाकडे राष्ट्रीय उत्सव म्हणून बघितले गेले. या उत्सवाचा विचार करता १८९३ आरंभापासून ते १९२० लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत त्यानंतर १९२० ते १९४७ देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, १९४७ ते १९८०, १९८० नंतर आजच्या तंत्रज्ञान-संगणक युग असे ४ टप्प्यांचा कालखंड आहे. सुरुवातीच्या नऊ दशकांत नव्हता तो फरक गेल्या तीन दशकात जाणवतो आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे.

महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण’गणेश’ बाजूला पडून ‘उत्साही उत्सवच’ जास्त होत आहे ही  दुःखदायक बाब आहे. देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी व जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून या आदर्श सार्वजनिक सोहळ्याला प्राप्त झालेले स्वरूप पाहून मात्र खंत वाटते. प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेलाही आव्हान देणारे आक्रमक स्वरही जाहिरपणे कानावर येत असतात. वाढते शहरीकरण, अरुंद रस्ते, वाहनांची गर्दी आणि उत्सवाच्या काळात निर्माण होणारे अनारोग्य ध्वनीप्रदूषण त्यात आजारी,अपंग,वृद्ध तसेच पादचारी आदींची संपूर्ण १२ दिवस होणारी गैरसोय व अडचणी याबाबत सातत्याने दरवर्षी पोलिसांना दखल घ्यावी लागते. त्यातून उत्सवाचा  मूळ हेतू दुर्लक्षित करून राजकीय किंवा धार्मिक शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने कायदेशीर बंधने खुशाल तुडवली जात आहेत.

गेल्या काही महिन्यापासून अर्ध्याधिक महाराष्ट्रात निसर्गाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकांचा उभारलेला संसार मोडून पडला आहे. निसर्गाने जात-पात-धर्माच्या भिंती पाडत मराठी माणसाला माणुसकीच्या आभाळाखाली आणले आहे. उध्वस्त झालेल्या मराठी माणसावर गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सर्व सणासुदीच्या दिवसांवर तीव्र दुष्काळाचे आणि न संपलेल्या कोरोनाचे सावट येणार आहे. संपूर्ण देशभर आर्थिक मंदीचे सावट मोठ्या प्रमाणात आले आहे, अनेक कंपन्या धडाधड बंद होत असल्याने लाखोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यापुढच्या काळात परिस्थिती अधिक बिघडली तर आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत आहे अशा बातम्यांच्या ऐवजी देशाची आर्थिक घडी दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे उद्योगपती आणि नोकरदार यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल ही भीती जनमानसात साधार व्यक्त होत आहे. झाकोळून टाकणारा समृद्ध अंधार अपेक्षित असताना यापुढचे दिवस फटफटीत उजाडणार अशीच परिस्थिती उद्भवली आहे. कुठल्याही संवेदनाशील माणसाला विषण्ण करणारा यापुढचा काळ असेल हे नक्की. म्हणून  यावेळी गणेशोस्तव साजरा करताना परिस्थितीचे आत्मभान जागे ठेवत राष्ट्रीय एकात्मता, सलोखा व सर्वधर्म समभावाशी सुसंगत वर्तन आणि आपापल्या कुटुंबाचे आरोग्य यांचे पुरेपूर भान ठेवून सुसंकृत महाराष्ट्राला साजेसा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा पार पाडावा. सर्व दुःख दूर करणारा श्री गणेश महाराष्ट्रावरीलच नव्हे तर जगावरील  संकटे दूर करेल आणि पुन्हा सर्वत्र आनंदीआनंद पसरेल अशी आशा व्यक्त करू या. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्ग गीतेवरील भाष्य ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाला प्रारंभ करताना विद्यादाता श्री गणेशाची प्रार्थना करतानाच प्रार्थना आळवली आहे, “देवा तूंचि गणेशु सकळमति प्रकाशु.” गणराया तू येत आहेस तर तुझ्या दिव्यप्रकाशाने सारे घरदार,परिसर आणि विश्वही उजळून जावो. सर्वांच्या मनातल्या अंधाराचाही विनाश होवो. तुझ्या मूर्त स्वरूपाची आम्ही जरी पूजा करीत असलो, तरी तूच या विश्वाचा निर्माता आहेस, तू ज्ञानरूप आणि विज्ञानरुप आहेस. तू ओंकार स्वरूप विश्वव्यापी आहेस. सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहेस. तुझे आगमन आम्हाला नवी जिद्द,निर्धार आणि नवे बळ देणारे ठरावे.

(लेखक हे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत.)