ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारच देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय

Image

मुंबई,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची संघटनात्मक बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडली. राज्य सरकारमध्ये असलेले पक्षाचे मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या पुढील ध्येयधोरणांबाबत मते व्यक्त करण्यात आली. तसेच सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक प्रश्न पवार साहेबांसमोर मांडले. यावर राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Image

चर्चेदरम्यान राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सूचना पवार साहेबांनी केली. त्यानुसार पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार त्यांच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करुन तात्काळ उपाययोजना करतील, असे मलिक म्हणाले. राज्य सरकारच्या अखत्यारितील प्रश्न निश्चितच सोडवले जातील. मात्र इंधन दरवाढ, गॅस दरवाढ असे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहेत. या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी कोरोना नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.

Image

रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारच देण्याचा पक्षाचा निर्णय

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. परंतु, ही सगळी परिस्थिती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात असताना ते निवडणुका घेऊ शकतात, अशी भूमिका ते मांडत आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचा आदेश दिल्यास त्या परिस्थितीत रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवारच देण्याचा पक्षाचा निर्णय झाला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.घटना दुरुस्तीमुळे बराच काळ आपल्याला निवडणुका टाळता येत नाहीत. एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून, एकमत करून आरक्षण देता येते का? याबाबतही राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे मलिक म्हणाले.