श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Displaying 1.jpg

औरंगाबाद,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतीय  परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे,  सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्ट्ये संतपीठ स्थापनेमागची आहेत. ह्या उद्दिष्टांची पुर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकारत लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी सांगितले.

Displaying _DSC9050.JPG

            विभागीय आयुक्त कार्यालयात श्री संत एकनाथ महाराज संतपीठाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, आदी उपस्थित होते.

 श्री सामंत म्हणाले की, मराठवाडा ही संतांचा इतिहास  सांगणारी भुमी आहे. अशा या भुमीत नावारुपाला येणारी संतपीठ ही संकल्पना केवळ विषयांच्या पुस्तकी वा बौध्दीक शिक्षणावर भर देणारी नसून हे समाज शास्त्राचे शिक्षापीठ न राहता समाजसेवेचे दिक्षापीठ होणार आहे. अशा या संतपीठामध्ये तात्काळ विद्यादानाचे काम सुरू होणे आवश्यक आहे. या संतपीठाला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Displaying _DSC9077.JPG

            बैठकीच्या सुरूवातीला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठा मधील प्रस्तावित नवीन विभाग व अभ्यासक्रमाचे स्वरुप याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, संत साहित्य, तत्वज्ञान आणि संगीत विभागाअंतर्गत एकूण 5 अभ्यासक्रमांची सुरूवात तात्काळ करता येऊ शकते. यामध्ये तुकाराम गाथा परीचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी किर्तन, हरीदासी किर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाण पत्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

            विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संतपीठामध्ये तात्काळ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 तारखेला पैठण येथील संतपीठाला भेट देऊन तेथील इमारतीची पाहणी करणार  असल्याचे सांगितले.

लेखकांनी ऐतिहासिक संशोधनपर लेखनावर अधिक भर द्यावाउदय सामंत

Displaying IMG_20210908_204931.jpg

बंजारा समाजाचा इतिहास जगासमोर आणून या समाजास विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य होते आहे. त्याचप्रकारे इतर समाजातील लेखकांनी देखील अशाप्रकारचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन दर्जेदार ऐतिहासिक संशोधनपर लेखन करावे, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.

तापडिया नाट्य मंदिर येथे हिंद ए रत्न मल्लुकी बंजारन, शहिद ए आजम लक्खशाह बंजारा या स्वर्णिम बंजारा इतिहासाच्या दहा खंडांपैकी पहिल्या दोन खंडांचे लोकार्पण मंत्री सामंत यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रोहयो मंत्री संदीपान भूमरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, यू.पी राठोड, साईनाथ दुर्गे, लेखक डॉ. अशोक पवार, डॉ. सुनीता राठोड-पवार आदींची उपस्थिती होती.

Displaying IMG_20210908_204228.jpg

मंत्री सामंत म्हणाले, एखाद्या संशोधनावर 22 वर्ष अव्याहतपणे काम करणे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ.अशोक पवार, डॉ.सुनिता राठोड-पवार या कुटुंबियाचे कौतुक आहे. स्वखर्चातून त्यांनी हा इतिहास जगासमोर आणला. या संशोधनाचा भावी पिढीस मोलाचा फायदा होईल. दहा खंड प्रकशित झाल्यास इतिहासात महत्वाची भर पडेल, असेही मंत्री सामंत म्हणाले. कार्यक्रमात पारंपरिक नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध.सु. जाधव यांनी केले. आभार डॉ. सुनीता राठोड-पवार यांनी मानले.

स्थानिक उद्योगांना पूरक रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत

स्थानिक उद्योगांना पूरक असणारे रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज शासकीय तंत्र निकेतन, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय आणि शासकीय विज्ञान संस्थेची आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री.सामंत बोलत होते.

Displaying 3.jpg

बैठकीस रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एम.डी.शिवणकर, शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य एफ.ए.खान, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.के.मौर्य, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एच.सातपुते, शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेचे प्रभारी संचालक सतीश देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले की, औरंगाबाद ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरात अनेक उद्योग आहेत. या उद्योगांना आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाने प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. असे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तंत्र शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्थानिक औद्योगिक वसाहतींना भेट द्यावी. उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना लागणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्या प्रकारचे अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करावेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या प्रसिध्द यादीमधील अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

श्री.सामंत यांनी यावेळी सदर महाविद्यालयांच्या कामकाजांचा आढावा घेतला. नवीन प्रवेश व नवीन अभ्यासक्रम याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे महाविद्यालयांच्या अडचणीही जाणून घेतल्या. उत्कृष्ट कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. प्रमोद येवले यांचा यावेळी श्री.सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.