अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील 8 हजार 919 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड

May be an image of one or more people, people standing and eyeglasses

हिंगोली, ८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील 30 मंडळापैकी 20 मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

या संदर्भात पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून जिल्ह्यातील पूर परिस्थिती, पिकांचे झालेले नुकसान, जिवित व वित्त हानी याबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व मालमत्तेचे पंचनामे करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. दि. 7 सप्टेंबर, 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 8 हजार 919 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 22 घरांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे 04 व्यक्ती पुरात वाहून गेलेले आहेत. तर कळमनुरी तालुक्यातील 03 तीन गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.