लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्णसंख्या

नवी दिल्ली, 22 जून 2020

प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्णसंख्या असणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा समावेश असून बरे होणारे आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत दिवसेंदिवस वाढत आहे.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या 21 जून, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या 153 व्या परिस्थिती अहवालानुसार भारतात लोकसंख्येची घनता जास्त असूनही प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी असणाऱ्या देशांपैकी हा देश आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 30.04 आहे तर जागतिक सरासरी त्याच्या तिप्पटीपेक्षा जास्त म्हणजे 114.67 आहे. अमेरिकेत प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 671.24 रुग्ण आढळतात तर जर्मनी, स्पेन आणि ब्राझीलमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 583.88, 526.22 आणि 489.42 आहे.

ही रुग्णांची कमी आकडेवारी म्हणजे कोविड -19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसह भारत सरकारच्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि प्रतिबंधात्मक सक्रिय दृष्टिकोनाचे फलित आहे.

आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण  2,37,195 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,440 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 55.77%पर्यंत पोहोचला आहे.

सध्या 1,74,387 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. कोविड-19 चे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील फरक सातत्याने वाढत असून तुम्ही तो खाली दिलेल्या आलेखावर पाहू शकता. बरे झालेले रुग्ण हे सक्रिय रुग्णांपेक्षा 62,808 ने जास्त आहेत.

कोविड-19 च्या चाचणी पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 723 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 262 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे एकूण 985 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  549 (शासकीय: 354 + खाजगी: 195)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 359 (शासकीय: 341 + खाजगी: 18)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा:  77 (शासकीय: 28 + खाजगी: 49)

Image

एकूण तपासलेल्या नमुन्यांच्या संख्येचा विचार करता दररोज तपासणी होणाऱ्या नमुन्यांच्या संख्येत नियमित वृद्धी होत आहे. गेल्या 24 तासात 1,43,267 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 69,50,493 नमुने तपासण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार, दिल्लीमधील कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या धोरणाबाबत अहवाल तयार करण्यासाठी 14 जून 2020 रोजी डॉक्टर विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉक्टर पॉल यांनी हा अहवाल सादर केला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, दिल्लीचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री/आरोग्यमंत्री तसेच डॉक्टर पॉल यांच्यासह केंद्रीय गृह आणि आरोग्य सचिव आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित होते.

इतर अपडेट्स:

  • भारतीय नौदलाच्या ‘ऐरावत’ जहाजाने मालदिवमधल्या माले बंदरामध्ये प्रवेश केला. परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने ‘वंदे भारत‘ मोहिमेची आखणी केली आहे. या अंतर्गत ‘समुद्र सेतू’ अभियान कार्यरत आहे. भारतीय नौदलाच्या ‘ऐरावत’ जाहजातून 198 भारतीयांना मालेमधून आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तामिळनाडूतील तूतिकोरीन बंदरामध्ये हे जहाज येणार आहे.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘एनसीईआरटी”च्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमामध्ये योग या विषयाचा समावेश करण्यासाठी बहुआयामी उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये ‘एनसीईआरटी’ने उच्च प्राथमिक ते माध्यमिक वर्गांतल्या मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि जीवनशैली विकसित करण्यासाठी योग या विषयाचे पाठ्य सामुग्री तयार केली आहे. त्याचबरोबर सन 2016 पासून ‘योग ऑलिंपियाड’चे आयोजनही करण्यात येत आहे. सध्याच्या कोविड-19 महामारी परिस्थितीमध्ये मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी घरामध्ये राहूनच कशा प्रकारे योगाभ्यासाचा सराव करावा, तसेच शारीरिक कसरत, व्यायाम करून आरोग्य सुदृढ ठेवावे, याचे मार्गदर्शन करीत आहेत. यावर्षी कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे योग ऑलिंपियाडचे प्रत्यक्ष आयोजन करणे अवघड आहे, हे लक्षात घेवून  ‘एनसीईआरटी’च्यावतीने ऑनलाइन योग प्रश्नमंजूषा घेण्यात येईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी जाहीर केले.
  • केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी “महत्वाकांक्षी” जिल्ह्यातील कोविड स्थिती आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला, यात  ईशान्येकडील राज्यांवर विशेष भर देण्यात आला. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने ईशान्येकडील आठ राज्यांमध्ये आरोग्य सुविधांच्या वाढीसाठी विशेषतः संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 190 कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 16 राज्यांमध्ये गौण वन उत्पादन योजनेसाठी किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) अंतर्गत आतापर्यंत 79.42 कोटी रुपये इतकी विक्रमी खरेदी झाली आहे. यासह, वर्षाची  खरेदी एकूण सरकारी आणि खाजगी व्यापार लक्षात घेता 200 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात आदिवासींचे जीवन आणि उपजीविका दोन्ही विस्कळीत झालेल्या असताना ही खरेदी म्हणजे आवश्यक रामबाण उपाय झाल्याचे सिद्ध झाले.  सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या आजारामुळे अभूतपूर्व परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली. अशा परिस्थितीत या योजनेने सर्व राज्यांना संधी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *