नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) प्रदान

  • नौदलाच्या हवाई विभागाने गेल्या सात दशकात देशाची अतुलनीय सेवा करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.  
  • नौदलाचा हवाई विभाग 1951 साली अस्तित्वात आला आणि आता त्यात 250  लढाऊ विमाने आहेत.
  • बांगलादेश मुक्तीसंग्रामात आयएनएस विक्रांतने केलेल्या नेत्रदीपक पराक्रमाचे राष्ट्रपतींकडून स्मरण
  • सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला अनुसरून भारतीय नौदलाचे भारतीयकरण करण्याच्या प्रयत्नाचे राष्ट्रपतींकडून कौतूक.  

गोवा ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गोव्यात आयएनएस हंसा इथे भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंटस कलर) हा सन्मान प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमानिमित्त, 150 जवानांनी पथसंचलन करत राष्ट्रपतींना मानवंदना दिली. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह, व्हाईस अॅडमिरल पी हरी कुमार, (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ पश्चिम नौदल कमांड) आणि रीयर अॅडमिरल फिलीपोज जी प्युमोटील यांच्यासह इतर अनेक अधिकारी आणि मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

देशात युद्ध आणि शांतता अशा दोन्ही काळात, देशाची अद्वितीय सेवा करणाऱ्या लष्करी विभागाला प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान केला जातो. नौदलाच्या हवाई विभागाने गेल्या सात वर्षात, आपल्या शौर्य आणि उल्लेखनीय सेवा देत, आपला ठसा उमटवला आहे. भारतीय सैन्यदलात पहिले प्रेसिडेंट्स कलर सन्मान मिळवण्याचा मान भारतीय नौदलाने पटकावला आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 27 मे रोजी 1951 रोजी त्यांना हा प्रदान करण्यात आला. त्यानंतर, नौदलाच्या दक्षिण नौदल कमांड, पूर्व नौदल कमांड, पश्चिम नौदल कमांड, पश्चिम ताफा, पाणबुडी विभाग, आयएनएस शिवाजी आणि भारतीय नौदल अकादमी यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला मिळालेला हा सन्मान म्हणजे, त्यांनी शांतता आणि युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी दिलेल्या सेवेला मिळालेली पावती होय. 1951 साली अस्तित्वात आलेल्या या विभागात, पहिल्यांदा सीलँड एअरक्राफ्ट समाविष्ट करण्यात आले होते, त्यानंतर 11 मे 1953 रोजी कोची येथे आयएनएस गरुड समाविष्ट करण्यात आले. आज नौदलाच्या  या ताफ्यात, नऊ हवाई तळे आणि तीन किनाऱ्यांवर  तीन नौदल एअर एनक्लेव्ह आणि अंदमान निकोबार ला एक अशी संपदा आहे. गेल्या सात दशकात हा विभाग, एक अत्याधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या आद्ययावत आणि उच्च क्षमता असलेले दल म्हणून विकसित झाला आहे. यात, 250 पेक्षा अधिक लढावू विमाने, सागरी टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर्स अनाई रिमोटद्वारे संचालित लढावू विमाने यांचा समावेश आहे. आज नौदलाच्या या हवाई सामर्थ्यच्या बळावर एखाद्या मोहिमेची पूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली जाऊ शकते. नौदलाचा हवाई विभाग, हा भारतीय नौदल-लष्करी,मुत्सद्दी, पोलीस आणि इतर अनेक मोहिमांसाठी महत्वाचा घटक सिद्ध झाला आहे.

या कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामात आयएनएस विक्रांतने केलेल्या महत्वाच्या आणि रोमहर्षक कामगिरीच्या स्मृतींना उजाळा दिला.  जगभरातील अनेक मित्र देशात, मानवतेच्या तसेच शांतता मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापनातही या विभागाने महत्वाचे योगदान दिले आहे, असेही राष्ट्रपती पुढे म्हणाले. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला अनुसरून नौदलाचे भारतीयीकरण करण्याच्या प्रयत्नांचे राष्ट्रपतींनी कौतूक केले.हवाई तंत्रज्ञान, अद्ययावत भारतीय शस्त्रास्त्र, लढावू विमानांसाठी सेन्सर आणि डेटा सूट्स या क्षेत्रातील नौदलाच्या लक्षणीय प्रगतीचाही राष्ट्रपती कोविन्द यांनी गौरव केला.  

यावेळी, या सन्मानासाठी राष्ट्रपतीनी या विभागाचे अधिकारी आणि खलाशांचे अभिनंदन केले. नौदलाच्या हवाई विभागाने या सात दशकात लक्षणीय प्रगती केली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.   तसेच, त्यांनी नौदलाच्या हवाई विभागातील सर्व ज्येष्ठ सैनिक आणि कार्यरत अधिकाऱ्यांचा देशला दिलेल्या सेवसाठी गौरवपूर्ण उल्लेख केला.