भारतीय नौदलाच्या गिर्यारोहण मोहिमेला आयएनएस त्रिशूळ या नौकेवरून सुरुवात

पुणे,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- नौदलाच्या पश्चिमी कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अॅडमिरल आर.हरी कुमार यांनी काल (03 सप्टेंबर 2021 रोजी) भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिशूळ या जहाजावर झेंडा दाखवून भारतीय नौदलातील जवानांच्या उत्तराखंडमधील त्रिशूळ-I या 7120 मीटर उंचीचे शिखर सर करण्यासाठीच्या गिर्यारोहण मोहिमेची सुरुवात करून दिली. या प्रसंगी अॅडमिरल हरी कुमार यांनी मोहिमेच्या संघनायकाला प्रतीक  म्हणून  बर्फ तोडण्याची कुऱ्हाड देऊन गिर्यारोहण पथकाला त्रिशूळ-I यशस्वीपणे सर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

वर्ष1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी सुरु असलेल्या ‘स्वर्णिम विजय वर्षा’च्या कार्यक्रमांचा भाग म्हणून या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. “त्रिशूळ युद्धनौकेपासून त्रिशूळ पर्वतापर्यंत” अशी या मोहिमेची संकल्पना आहे. भारतीय नौदलाच्या विविध विभागांतील 19 सदस्यांचा समावेश असलेल्या या पथकाचे नेतृत्व कमांडर विष्णू प्रसाद करणार आहेत. या पथकाचे सदस्य 15 ऑगस्ट 2021 रोजी मुंबईत एकत्र आले आणि पथकातील सदस्यांची शारीरिक क्षमता आणि तांत्रिक कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी त्यांनी भीमाशंकरच्या डोंगर परिसरात तंदुरुस्तीविषयक प्रशिक्षण सत्रे, सहनशक्ती विषयक प्रशिक्षण आणि पर्वतारोहणाचा सराव केला.

हे पथक आता दिल्लीला जाईल आणि तिथून उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील सुतोल येथे पोहोचेल. हा या पथकाच्या मोहिमेसाठी सुरुवात करण्याचा सर्वात जवळचा रस्ता आहे. या ठिकाणी वातावरणाशी जुळवून घेण्याची तसेच वाहतूकविषयक तयारी पूर्ण झाल्यानंतर हे पथक 14 सप्टेंबर 2021 ला बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी पर्वतारोहणाला सुरुवात करेल.