आमदारांच्या नियुक्तीवर तोडगा ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटलेे

मुंबई ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मुख्यमंत्र्यासह उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारच्या शिफारशीनंतरही राज्यपालांकडून या नावांवर शिक्कामोर्तब होत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर न्यायालयात हा प्रश्न गेल्यानंतर न्यायालयानेही याबाबत मत व्यक्त केले. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

गेल्या आठ महिन्यांपासून या 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. याबाबत पुणे दौर्‍यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे या मुद्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार ही भेट ठरली होती. दरम्यान, या भेटीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांना आमदार नियुक्तीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचं सांगितलं. 12 आमदारांच्या यादीतील कोणाची नावे वगळण्याबाबत कसलीही चर्चा झाली नाही, किंवा राज्यपालांनीही कोणत्याही नावावर आक्षेप घेतलेला नसल्याचं थोरात म्हणाले.

राज्यातील परिस्थितीविषयी दिली माहिती
राज्यातील घडामोडी व परिस्थितीची माहिती सरकारने देणे ही आमची घटनात्मक जबाबदारी आहे. राज्यपालांना आम्ही विविध विषयांवरून भेटतच असतो. राज्यातील पूरपरिस्थिती व कोरोनाची स्थिती याविषयी राज्यपालांना माहिती दिल्याचे उपमु‘यमंत्री अजित पवार यांनी रात्री माध्यमांशी बोलताना सांगितले. 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल झालेल्या चर्चेविषयी मात्र पवार यांनी स्पष्ट काहीच सांगितले नाही.