‘द फिट इंडिया’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी क्रीडा संस्कृती विकसित होण्यासाठी गती देतील: अनुराग ठाकूर

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये क्रीडा-संलग्न अध्ययनाचा समावेश असून,यातून मुलांना आयुष्यभर तंदुरुस्त जीवनशैली आत्मसात करण्याची शिकवण मिळेल: धर्मेंद्र प्रधान

क्रीडा आणि फिटनेस या विषयावरील पहिल्याच देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा प्रारंभ

नवी दिल्‍ली,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. फिटनेस म्हणजेच तंदुरुस्ती आणि क्रीडा या विषयावरील ही पहिलीच देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे. युवा व्यवहार क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक देखील यावेळी उपस्थित होते. टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील पदक विजेते नीरज चोप्रा आणि पी. व्ही. सिंधू आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. काही शालेय विद्यार्थ्यानी या उद्घाटन सोहळ्यात अचानक घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला.

या देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती आणि खेळाविषयी जागृती करणे आहे. त्याचवेळी त्याना राष्ट्रीय मंचावरील स्पर्धेत सहभागी होत, त्यांच्या शाळांसाठी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. देशात सुरु असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. तसेच सर्व राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावत आणत, त्यांना बौद्धिक कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबतीतल्या स्पर्धेत सहभागी करुन घेण्याचा हा प्रयत्न आहे.

फिट इंडिया स्पर्धेविषयी बोलतांना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले, “बौद्धिक विकास हा शारीरिक विकासाइतकाच महत्वाचा असतो. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे, मुलांच्या मनात अगदी लहान वयात बौद्धिक सजगता वाढेल आणि क्रीडाविषयक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी प्रश्न मंजुषा अतिशय योग्य मार्ग आहे.  आपल्या ऑलिंपिकमधील यशोगाथेसह, भारताला क्रीडा क्षेत्राचा अत्यंत समृद्ध इतिहास आहे. आम्ही देशात, क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी या स्पर्धेद्वारे एक गती देतो आहोत, शालेय विद्यार्थीच या स्पर्धेचे अजिंक्यवीर ठरणार असल्याने, त्यांच्यात या मार्फत, स्पर्धात्मक भावना आणि संघभावना विकसित होण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच सर्वांगीण विकासावर आणि आयुष्यातील खेळाच्या महत्त्वावर भर दिला आहे. त्यांनी वारंवार मुलांशी संवाद साधल्यामुळे तणावमुक्त वातावरणात शिक्षण आणि विकसित होण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे. फिट इंडिया प्रश्नमंजुषा हे ही त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे.” 

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी बोलतांना म्हणाले की, तंदुरुस्ती आणि शिक्षण यांचा एकमेकांशी अत्यंत दृढ संबंध आहे. नवे शिक्षण धोरण-2020 विद्यार्थ्यांसाठी, क्रीडा-संलग्न अध्ययनावर विशेष भर देण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी आयुष्यभर तंदुरुस्त जीवनशैली आत्मसात करावी,असाच फिट इंडिया अभियानाचा उद्देश आहे. कोविड-19 महामारीमुळे लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे फिट इंडिया अभियानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना, त्यांचे तंदुरुस्ती आणि क्रीडाविषयक ज्ञान दाखवण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होईल, पारंपरिक निरोगी जीवनशैली आणि भारतीय खेळांविषयी, खेळाडूंविषयी आणि क्रीडाक्षेत्रविषयी भारतातील समृद्ध ज्ञानाबद्दल जागृती निर्माण होईल, असे प्रधान यावेळी म्हणाले.  

प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी फिट इंडिया अभियानात सहभाग घेतला आहे. तसेच, सर्व शाळांनी फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेतही भाग घेऊन नवा तंदुरुस्त भारत बनविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांनी आपल्या भाषणात केले.

‘आता आपण क्रीडा क्षेत्रासाठी इतकं भरीव काम करत आहोत, याचा मला अत्यंत आनंद आहे. यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल’ अशी भावना नीरज चोप्राने यावेळी व्यक्त केली.  फिट इंडिया प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना एक मंच उपलब्ब्ध करून देईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन पी व्ही सिंधू ने यावेळी केले.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळांना फिट इंडियाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जाऊन, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान नोंदणी करावी लागेल आणि स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे ऑक्टोबर अखेर पर्यंत द्यायची आहेत.

प्राथमिक फेरीतील विजेते डिसेंबरमध्ये होणाऱ्या राज्य पातळीवरच्या फेरीत भाग घेतील आणि राज्य फेरीचे विजेते जानेवारी –फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेत भाग घेतील. प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या अंतिम फेरीचे स्टार स्पोर्ट्सवरून थेट प्रक्षेपण केले जाईल.