मेहनत घ्या, तुम्हाला खूप काम करायचे आहे-नरेंद्र मोदी

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.कराड यांनी घेतली सहपरिवार पंतप्रधानांची भेट

औरंगाबाद,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना परिवारासह बोलावून अर्धा तास वेळ दिला. कौटुंबिक माहिती घेत मराठवाड्यातील परिस्थिती, जन आशिर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद, वित्त मंत्रालयातील कामकाजाचा अनुभव जाणून घेत ‘मेहनत घ्या, तुम्हाला खूप काम करायचे आहे’ अशा शब्दात मोदी यांनी प्रोत्साहित केले.

मुलगा हर्षवर्धनने फोटो काढताना मास्क काढण्याबाबत विचारले तेव्हा दोन डॉक्टर असताना आम्ही बिनधास्त असल्याचे विनोदी टिपणीही मोदी यांनी करत डॉ.कराड यांच्या नातीला चॉकलेटही भेट दिले.

Displaying 1 september.jpg

भाजपचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर काढलेल्या जन आशिर्वाद यात्रेला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवार दि. 31 ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. मोदी यांनी कराड परिवाराला अर्धा तास वेळ दिला.

मराठवाड्यात जन आशिर्वाद यात्रेच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील निळागावचे शेतकरी दत्तराव सोळंके यांनी दिलेला फेटा तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे आभार पत्र आणि माता भगिनींनी पाठवलेल्या राख्या डॉ.कराड यांनी मोदी यांच्याकडे दिल्या. तर औरंगाबादची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेली हिमरू शालही दिली. तेव्हा ही कश्मीरमधील शाल आहे का? असा प्रश्‍न केला. डॉ.कराड यांनी औरंगाबादमधील या शालीची माहिती देऊन अजिंठा, वेरुळ लेण्याप्रमाणे तिचे वेगळे महत्व असल्याचे सांगितले.

डॉ.कराड यांच्या समवेत पत्नी डॉ.अंजली, मुलगा हर्षवर्धन, वरुण व सून रश्मी आणि नात आविशा होते. मोदी यांनी प्रत्येकाची ओळख करुन घेत शिक्षण, व्यवसाय विचारला. तर नात आविशा हिला स्वतः चॉकलेट देत तिच्याशी मराठीतून संवाद साधला. फोटा काढताना हर्षवर्धन यांनी मास्क काढू का? असे विचारले तेंव्हा आपल्यासोबत दोन डॉक्टर असताना आम्ही बिनधास्त आहोत अशी विनोदी टिपणी करत मास्क काढायला हरकत नसल्याचे सांगितले.

सहजपणे कुटुंबातील सर्वांशी संवाद साधत मोदी यांनी डॉ.कराड यांचा वित्त मत्रालयातील कामाचा अनुभव, मराठवाड्यातील परिस्थिती, जन आशिर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद याची बारकाईने माहिती घेत ‘मेहनत करा, तुम्हाला खूप चांगले काम करायचे आहे.’ अशा शब्दात प्रोत्साहित केले.

अहमदपूर तालुक्यातील चिखली गावात सामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ.कराड वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगाबादला आले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच जनसंपर्क वाढला. भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आले आणि दोन वेळा महापौर झाले. पक्षाच्या अनेक जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या. थेट संपर्क, वागण्यातील सहजता, उत्तम संपर्क यामुळे डॉ.कराड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राज्यसभेवर घेऊन केंद्रात वित्त राज्यमंत्री पदाची संधी देऊन ओबीसी समुहाला प्रतिनिधीत्व दिले आहे. 
खूप समाधान वाटले-डॉ.भागवत कराड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबासहित भेटण्यासाठी वेळ दिला. सर्वांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. कामकाजाचा अनुभव जाणून घेत कष्ट करा, तुम्हाला खूप काम करायचे आहे असे सांगत प्रोत्साहन दिले. सर्वोच्च पदावर असतानाही त्यांची सहजता अनुभवता आली.  त्यामुळे मोदी यांच्या भेटीने अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याने खूप समाधान वाटते अशी प्रतिक्रिया डॉ.कराड यांनी व्यक्त केली.