डीपी रस्त्यांवर रेखांकनानुसारच विद्युत खांब लावा- प्रशासक

औरंगाबाद,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- शहरातील डी पी रस्त्यांवर विद्युत खांब (पोल) लावताना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (एम एसईबी) यांनी औरंगाबाद महानगरपालिका नगररचना विभागाकडून संबंधित डी पी रस्त्याचे रेखांकन करून घ्यावे आणि त्या रेखांकनानुसारच पोल लावावे, अशी सूचना आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. 

रुंदीकरण करण्यात आलेले रस्त्यात अडथळा निर्माण करणारे एमएसईबीचे पोल आणि डीपी हस्तांतरित करणे, हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्रास वीज पुरवठा करणे इत्यादी विषयांवर पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्त दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एमएसईबी तर्फे एमएसईबीचे सह व्यवस्थापकीय संचालक, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय डॉ मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता औरंगाबाद परिमंडळ श्री भुजंग खंदारे, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री लक्ष्मीकांत राजेली यांची उपस्थिती होती.

पोल आणि डीपी हस्तांतरित करण्याचा कामास गती देण्यासाठी चार सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश प्रशासक यांनी यावेळी दिले. सदरील समितीत एमएसईबी तर्फे कार्यकारी अभियंता शहर विभाग-1 महेश पाटील आणि कार्यकारी अभियंता शहर विभाग-2 प्रेमसिंग राजपूत आणि महानगरपालिका तर्फे कार्यकारी अभियंता (विद्युत) ए बी देशमुख आणि उप अभियंता (विद्युत) मोहिनी गायकवाड यांच्या समावेश राहील.

सदरील समिती खालील मुद्यांवर 15 दिवसात अहवाल सादर करतील; अ) रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारे किती पोल आणि डीपी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरित पोल आणि डीपी लवकरात लवकर स्थलांतरित करणे. ब) इतर रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे किती पोल आणि डीपी स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. क) डीपी रस्त्यांवर पोल लावताना नगररचना विभागाशी समनव्य ठेऊन रस्त्याचे रेखांकणानुसार पोल लावणे. ड) ट्रान्सफर स्टेशन आरक्षित जागेवर स्थापित करणे.ई) मंजूर रेखांकनात पथ दिव्यांसाठी स्ट्रीट लाईट फेस टॅग बसविणे.याशिवाय, हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्रास वीज पुरवठा करणे बाबत चर्चा करण्यात आली. याविषयी कचरा प्रक्रिया केंद्राचा बाजूला जागा उपलब्ध करून दिली तर तिथे प्रकल्पासाठी एक सब स्टेशन उभारता येईल, अशी सूचना विद्युत विभागाचे श्री खंदारे यांनी केली.

 सदरील बैठकीत शहर अभियंता एस डी पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए बी देशमुख, उप अभियंता (विद्युत) मोहिनी गायकवाड व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.