‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

नांदेड ,३१ ऑगस्ट /प्रतिनिधी :– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधील इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये दि.२९ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येत असतो.

विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दिपक बच्चेवार, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांची उपस्थिती होती.

Displaying DSC_0378.JPG

यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड म्हणाले की,आजच्या तरुणांवर देशाचा सन्मान वाढविण्याची जबाबदारी आहे. सध्या होत असलेल्या अनेक जागतिक खेळामध्ये जेव्हा आपल्या देशाचा खेळाडू पदक जिंकतो तेव्हा देशाचे नाव उंचावते आपल्याला ते पदक दिसते ती प्रसिद्धी दिसते पण त्यामागचे त्या खेळाडूंचे अपार कष्ट दिसत नाहीत. मेजर ध्यानचंद या खेळाडूंने आपल्या देशाचा झेंडा अटकेपार रोवला म्हणून देशभर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो. या विद्यापीठातही असे खेळाडू घडावेत. अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दिपक बच्चेवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त महत्त्व स्वतःच्या शारीरिक आरोग्याला दिले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, खेळ आवश्यक आहे. शेवटी अध्यक्ष समारंभामध्ये कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, खेळल्यामुळे खेळाडूवृत्ती वाढते. जी विद्यार्थ्यांना जीवनात प्रत्येक जागी उपयोगी पडत असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती अंगी जोपासली पाहिजे. या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्वांचा त्यांनी उपयोग घ्यावा. देशाचे आणि विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमास डॉ. बाबुराव घायाळ, डॉ. बालाजी जाधव, डॉ. मनोज पैंजणे, डॉ.जयदीप कहाळेकर,डॉ. किरण येरावार, डॉ. चरणजीतसिंग महाजन, डॉ. दिनकर हंबर्डे, डॉ.ज्योती गायकवाड, डॉ. छाया कुटे यांच्यासह खेळाडू, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले. व कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय गीत गाण्यात आले.