शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीची छापेमारी

Image

यवतमाळ : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडी अर्थात, अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचे पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरू आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं.२००६ चे प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभं करण्यात आलं होतं. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आलेला आहे.

शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. ईडी कार्यालयात हजर राहण्याचं फर्मान काढण्यात आलं. त्यामुळं शिवसेनेत खळबळ उडाली असतानाच शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षणसंस्थांवर ईडीनं छापे घातले. या शिक्षणसंस्थांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीनं कारवाई केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा सुरु आहे. यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री अनिल परब  खासदार भावना गवळी, राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हे सर्व ईडीच्या निशाण्यावर आहेत.ईडीच्या नोटिसांची माहिती भाजप नेत्यांना नेमकी कशी कळते, असा सवाल आता शिवसेनेनं केलाय. तर केवळ विरोधकांवरच कारवाई कशी होते? भाजपचे नेते धुतल्या तांदळाचे आहेत का? असा सवाल शिवसेना आणि काँग्रेसनं केला आहे. 

भाजप आमदाराच्या 500 कोटी प्रकरणाची चौकशी का नाही? भावना गवळींचा थेट सवाल

भावना गवळी यांना या संदर्भात विचारले असता, ‘किरीट सोमय्या यांनी जी तक्रार केली यामध्ये कितीही चौकशी केली तरी काही आढळणार नसून, केंद्र सरकार शिवसेनेच्या मागे विनाकारण ईडी लावत असल्याचा आरोप केला आहे.

‘केंद्र सरकार हे जुलमी आहे. त्यांच्याकडून एका प्रकारे आणीबाणी सुरू आहे. कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिममध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे दिले. मात्र त्यावर अद्याप चौकशी लागली नाही. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे’, असा आरोपही गवळी यांनी केला.

जर माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा, पण भाजप आमदाराने जमीन घोटाळा करून त्यांनी  500 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. माझी चौकशी ईडी करत असेल तर त्यांची सुद्धा चौकशी का केली जात नाही, अनेक लोकांच्या कारखाने आहे, संस्था आहे, त्यांची चौकशी का होत नाही’, अशी मागणीही गवळी यांनी केली.

तर आज सकाळी ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.