पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अवनी लेखरा ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू

  • टोक्यो पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखराचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
  • क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल  अवनी लेखराचे अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा 

टोकियो,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :- अवघ्या 19 वर्षांची भारतीय पॅरा खेळाडू अवनी लेखराने टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच ऑलिंपिक स्पर्धेत, अवनी ने महिलांच्या 10 मीटर रायफल SH1 श्रेणीत, 249.6 गुण मिळवत पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत विक्रम रचला आणि जागतिक विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

राजस्थान मध्ये सहायक वनसंरक्षक पदावर कार्यरत असलेली अवनी, जयपूरच्या जेडीए शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत असून, तिने पॅरालिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत 621.7 गुण मिळवत, सातवा क्रमांक गाठला होता. 

2012 साली झालेल्या रस्ते अपघातानंतर अवनी व्हील चेअरवर आहे. शाळेतही कायम अव्वलस्थानी येणाऱ्या अवनीला विश्वास आहे, की आयुष्यात केवळ सर्वकाही मिळणे महत्वाचे नाही, तर आपल्याकडे जे आहे, त्यातूनच सर्वोत्तम साध्य करणे, याला आयुष्य म्हणतात.

“अभूतपूर्व कामगिरी अवनी! अत्यंत परिश्रम आणि चिकाटीने, तू मिळवलेल्या या सुवर्णपदकाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन! तुझ्या मेहनती वृत्तीमुळे आणि नेमबाजीबद्दल तुला असलेल्या आकर्षणामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. भारतीय क्रीडाविश्वासाठी हा खरोखरच अक विशेष क्षण आहे. तुझ्या भविष्यातील कामगिरीसाठी तुला खूप शुभेच्छा.” अशा शब्दांत पंतप्रधानांनी ट्वीट करुन अवनी चे कौतूक केले आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी, अवनी लेखराच्या या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा  दिल्या आहेत. “अवनीने आज पहिले सुवर्णपदक जिंकले ! ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला ठरली आहे, भारतासाठी हा निश्चितच ऐतिहासिक क्षण आहे. 10 मीटर AR स्टँडिंग SH1 श्रेणीतील अंतिम स्पर्धा तीने जिंकली आहे. तिने मिळवलेले 249.6 गुण पॅरालिंपिक स्पर्धेत विक्रमी ठरले आहेत, तसेच जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारे आहेत.” असे ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

2017 पासून अवनीने अनेक जागतिक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.  2017 ला झालेल्या WSPS  जागतिक विश्वचषक स्पर्धेत, आर-2 श्रेणीत, ज्युनिअर जागतिक विक्रम  रचत तिने रौप्य पदक जिंकले होते, बँकॉक इथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्य , 2017, साली ओसायजेक  इथे रौप्य पदक, क्रोएशिया इथे,ही रौप्य तिने मिळवले होते.तसेच टोक्यो पॅरालिंपिक साठी फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या स्पर्धेत ती पात्र ठरली होती

2017 च्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळाल्यापासून सरकार तिला आवश्यक त्या सुविधा देत आहे. टारगेट ऑलिंपिक पोडीयम  योजनेअंतर्गत, तिला सहाय्य करण्यात आले, त्यानंतरही, एसीटीसीने तिचे प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी तिला मदत केली. या सर्व पाठिंब्यामुळे, तिने आजवर 12 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भाग घेतला आहे. त्याशिवाय, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरातही ती सहभागी होत असते. तिच्या घरात, संगणकीकृत डिजिटल नेमबाजी लक्ष्य लावण्यात सरकारने तीला मदत केली असून इतर सहायक उपकरणेही पुरवली आहेत.