भारत देशाबद्दल युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद, ३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-अनेक राज्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या  प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज डॉ कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे हे बलिदान विसरता येणार नाही, त्यांचे स्मरण करतच आपल्याला भविष्यात वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

सध्या देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असल्याचं सांगताना त्यांनी येत्या काही दिवसात, भारत जगातील एक शक्तीशाली देश बनेल असा विश्वास व्यक्त केला. देशातील  भष्ट्राचार आणि दहशतवाद नष्ट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला गेल्या काही वर्षात उत्तम यश मिळाले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं जलील यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

केंद्र संचालक जयंत कागलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी व्याख्यानमालेची संकल्पना मांडली. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या “आजादी का अमृत महोत्सव” व्याख्यानमालेचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सोबत खासदार सय्यद इम्तियाज जलील, केंद्र प्रमुख जयंत कागलकर, प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित वर्षभर चालणाऱ्या या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांचीस्वातंत्र्य लढ्याशी संबंधित  विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील.

औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाला येत्या एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त विभागाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या  ‘अवलोकन चाळीशीचे’ या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खा. जलील यांच्या हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक,  तसंच समीक्षक आणि  श्रोते यांनी सांगितलेल्या आठवणी, या ई- पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.