खादी, ग्रामोद्योग महामंडळाच्या ‘स्वप्नांचे कौतुक’ कॉफीटेबल बूक, लघुपटाचे प्रकाशन

मुंबई,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘स्वप्नांचे कौतुक’ या कॉफीटेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उपस्थित होते.

राज्यातील खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांमधून यशस्वीपणे रोजगार निर्माण करणाऱ्या ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा या कॉफीटेबल बूकमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसायबरोबर हस्तकला, निसर्गपूरक व्यवसाय आदी ग्रामोद्योगांनी यशस्वीरित्या उभारलेले उद्योग हे नव तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा आशावाद श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा, तसेच त्यांचे स्थलांतर थांबावे आणि ग्रामीण भागातच कामयस्वरुपी उद्योग उभा रहावा हे मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुणे हातकागद संस्थेने तयार केलेले फोल्डर्स, डायरी व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे श्री.देसाई यांनी अनावरण केले.