नारायण राणे यांचे कणकवलीमध्ये अभूतपूर्व स्वागत

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जोरदार शॉक!

कणकवली (प्रतिनिधी): भाजप जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे त्यांच्या होम पिच कणकवलीत अभूतपूर्व स्वागत झाले. शुक्रवारी रात्री उशीरा आगमन होऊन कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला. जंगी स्वागत डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात हा क्षण संस्मरणीय ठरला.

राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत आगळे वेगळे असे लक्षवेधी स्वागत नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले. स्वागत सोहळयातसिंधुगर्जना ढोल पथकाचा अविष्कार रोमहर्षक होता. यावेळी राणे यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, यात्रा प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, अतुल काळसेकर, संध्या तेरसे, सुरेश सावंत, मिलींद मेस्त्री, महेश सावंत, नगरसेवक अभिजित मुसळे, राजश्री धुमाळे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, कणकवली नगरपंचायत नगरसेवक उपस्थित होते.

एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. नारायण राणे कणकवलीमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला असलेल्या रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाराज्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर राणे तिथून निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार करंट लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी करंट लागत असल्याचं सांगत सावध केलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर राणेंनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. 

कणकवली बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ही यात्रा जाणवली येथील मारुती मंदिरकडे थांबून श्री देव मारुतीचे दर्शन मंत्री राणे व पदाधिकाऱ्यांनी घेतले. यावेळी दीप ओवाळून आणि पुष्पवृष्टी करून मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले. फटक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गरज करत या यात्रेचे स्वागत करण्यात आले.