‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

पुणे,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-  भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ राज्यातील भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या केंद्राचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील भूजलाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यामुळे विविध कारणांसाठी वाढलेली पाण्याच्या मागणीचे योग्य व्यवस्थापन करणं शक्य होईल. भूजल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ ही भूजल व्यवस्थापनाच्या डिजिटल कामाची सुरुवात आहे. या ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’च्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या माहितीचा सुयोग्य आणि सक्षमतेनं वापर करण्याची गरज आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था काम करीत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठा कालावधी लागतो. पुढच्या पिढीचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करणे ही काळाची गरज आहे.

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून राज्यासाठी भूजलाच्या बाबतीत एक दर्जेदार यंत्रणा उभी रहात आहे. आपल्या राज्यासाठी भूजल उपलब्धता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. ती आपल्याला जपली पाहिजे. यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, भुगर्भातील भूजल तपासणी करण्यासाठी भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याचे सूक्ष्म नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. हर घर जल, हर घर नल या योजनेच्या माध्यमातून राज्यात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन काम करीत आहे.

जलसंपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे. जलसंपत्ती वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संपूर्ण प्रकारे प्रयत्न करणार असल्याचेही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे उभारणीमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शेती विकास केंद्रासारखे विविध केंद्र खासगी उद्योजक व शासन यांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. त्यामुळे शाश्वत विकासविषयक पायाभूत विकासाचे काम होण्यास मदत होणार आहे. त्यातूनच विकासाचा इंद्रधनुष्य आपल्याला बघायला मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहसंचालक डॉ. साळवे यांनी मानले.