शिवसेनेच्या दणक्याने लक्ष्मणरेषा उत्पादन बनविणाऱ्या कंपनीचा माफीनामा

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचा कंपनीच्या व्यवस्थापनाला सज्जड दम

मुंबई,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- झुरळ पाहिल्यावर एक महिला तिथे काम करत  असलेल्या सुताराच्या अंगावर  उडी मारते. व तो तिला अलगद झेलतो व तिचा नवरा हे सगळं पाहत असतो. अशी जाहिरात करून समस्त महिलांचा जाहीर अपमान करत असलेल्या  कंपनीचे डोके शिवसेनेच्या दणक्याने ताळ्यावर आले आहे.

लक्ष्मणरेषा या झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने  प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत समस्त महिला वर्गाच्या अपमानाच्या विरोधात शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आवाज उठवला होता. तसेच याची थेट तक्रारच ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया व  महाराष्ट्र महिला आयोग  यांच्याकडे केली होती व या जाहिरातीचे प्रक्षेपण त्वरित थांबविण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या दणक्यामुळे या कंपनीने समस्त महिला वर्गाची माफी मागितली असून ती जाहिरात यापुढे प्रक्षेपित केली जाणार नाही असे आश्वासन आमदार डॉ. मनीषा कायंदे याना दिले आहे.

 आज एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समान नाहीत हेच  या जाहिरातीत अधोरेखीत केले होते. सायना नेहवाल, मेरी कोम, मीरा कुमारी सारख्या भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकून भारताचे  नाव जगात रोषण करीत  असताना  जाहिरातीतील  महिलांना कमकुवत दाखवून आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न  यापुढे खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा डॉ. मनीषा कायंदे यांनी या कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला आहे.